"इराणमधील हिंसक आंदोलनामागे अमेरिकेचा कट, ट्रम्प गुन्हेगार..."; खामेनेई यांची संतप्त भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 19:38 IST2026-01-17T19:37:54+5:302026-01-17T19:38:26+5:30
ट्रम्प यांनी स्वत: अशांततेत हस्तक्षेप केला. विधाने केली, आंदोलनकर्त्यांना भडकावले. इतकेच नाही तर या आंदोलकांना सैन्य पाठिंबा देण्याची भाषा वापरली असं खामेनेई यांनी म्हटलं.

"इराणमधील हिंसक आंदोलनामागे अमेरिकेचा कट, ट्रम्प गुन्हेगार..."; खामेनेई यांची संतप्त भूमिका
तेहरान - इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी शनिवारी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तीव्र हल्ला चढवला. ट्रम्प गुन्हेगार आहेत. इराणमध्ये झालेल्या मृत्यू, नुकसान आणि बदनामीसाठी खामेनेई यांनी ट्रम्प यांना जबाबदार धरले. इराणमध्ये अलीकडच्या काळात सुरू असलेली अशांततेमागे अमेरिकेने कट रचल्याचा आरोप इराणचा आहे.
इराण इंटरनॅशनल या स्थानिक माध्यमाच्या वृत्तानुसार खामेनेई म्हणाले की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणी राष्ट्राचे नुकसान केले आहे. त्यासाठी ते दोषी मानले जातात." इराण सरकारी पातळीवर संयम बाळगेल, परंतु हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांबद्दल कोणतीही सौम्यता दाखवली जाणार नाही. देशाला युद्धात ढकललं जाऊ शकत नाही. परंतु देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना नक्कीच शिक्षा होईल. देशात सुरु असलेल्या आंदोलनामागे परदेशी शक्तींचा हात आहे. इराणमध्ये अशांतता आणण्याचा अमेरिकेचा डाव आहे. इराणवर कब्जा करणे हे त्यांचे ध्येय आहे असं त्यांनी आरोप केला.
तसेच ट्रम्प यांनी स्वत: अशांततेत हस्तक्षेप केला. विधाने केली, आंदोलनकर्त्यांना भडकावले. इतकेच नाही तर या आंदोलकांना सैन्य पाठिंबा देण्याची भाषा वापरली. या आंदोलनकर्त्यांनी हिंसक आंदोलन करणारी जनता म्हणून पुढे दाखवले. ज्याप्रमाणे इराणी जनतेने दंगलखोरांचे कंबरडे मोडले, त्याचप्रमाणे त्यांच्यामागील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कट रचणाऱ्यांचेही कंबरडे मोडले जाईल असा इशाराही इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिला आहे.
काय घडतंय?
काही आठवड्यांपासून इराणमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचंड असंतोष उफाळला आहे. जवळपास सर्व प्रमुख शहरांमध्ये निदर्शने सुरू असून, ती आता केवळ आर्थिक मागण्यांपुरती मर्यादित राहिलेली नाहीत. महागाई, बेरोजगारी, चलन अवमूल्यन, वस्तूंची टंचाई, यामुळे पेटलेला रोष हळूहळू थेट राजकीय सत्तेविरुद्धच्या बंडात रूपांतरित झाला आहे. इस्लामी गणराज्याची संपूर्ण रचना, सर्वोच्च नेत्यांचे अधिकार आणि दडपशाहीच्या विरोधात सामान्य जनता उघडपणे रस्त्यावर उतरली आहे.