अमेरिकेची सर्वात मोठी EXIT! ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडली, संयुक्त राष्ट्रांसह भारतालाही धक्का...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 07:52 IST2026-01-08T07:51:20+5:302026-01-08T07:52:46+5:30
Trump US Withdraws International organizations: ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जागतिक राजकारणात अमेरिका पुन्हा एकदा एकलकोंड्या भूमिकेकडे झुकत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. भारतासाठी हा राजनैतिक स्तरावर मोठा धक्का मानला जात असून, आता इतर देशांच्या सोबतीने भारत ही आघाडी कशी टिकवून धरतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

अमेरिकेची सर्वात मोठी EXIT! ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडली, संयुक्त राष्ट्रांसह भारतालाही धक्का...
विस्तारवादी मानसिकतेत असलेल्या अमेरिकेने अवघ्या जगाला धक्का देणारा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'अमेरिका फर्स्ट' या आपल्या धोरणाला अधिक आक्रमक करत जागतिक राजकारणात खळबळ माजवून दिली आहे. भारताच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'इंटरनॅशनल सोलर अलायन्स' (ISA) सह तब्बल ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय संघटना आणि करारांमधून बाहेर पडण्याचा औपचारिक निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे.
ट्रम्प यांनी एका महत्त्वपूर्ण मेमोरँडमवर स्वाक्षरी केली असून, अमेरिकेच्या हिताच्या आड येणाऱ्या किंवा अमेरिकेच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणाऱ्या जागतिक संस्थांमधून तात्काळ बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या पुढाकाराने आकाराला आलेल्या 'इंटरनॅशनल सोलर अलायन्स'चा प्रामुख्याने समावेश आहे. व्हाइट हाऊसने सर्व सरकारी विभागांना या संस्थांमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांना दिला जाणारा निधीही कायद्याच्या चौकटीत राहून रोखला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
अमेरिकेची भूमिका काय?
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले आहे की, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. ज्या जागतिक नोकरशहांच्या संघटना अमेरिकेच्या हिताच्या विरोधात काम करतात किंवा जिथे अमेरिकन करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी होते, अशा संस्थांना आम्ही यापुढे सबसिडी देणार नाही."
या संघटनांवरही पडली कुऱ्हाड:
ट्रम्प प्रशासनाने ३५ गैर-संयुक्त राष्ट्र संघटना आणि ३१ संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांमधून माघार घेतली आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील संस्थांचा समावेश आहे:
इंटरनॅशनल सोलर अलायन्स (ISA)
इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN)
इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC)
युएन वॉटर (UN Water)
युएन पॉप्युलेशन फंड (UNPF)
भारतावर काय परिणाम होणार?
'इंटरनॅशनल सोलर अलायन्स' हे पंतप्रधान मोदींचे एक महत्त्वाचे जागतिक स्वप्न आहे. सौर ऊर्जेच्या क्षेत्रात भारताला जागतिक नेता बनवण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे होते. मात्र, अमेरिकेने माघार घेतल्यामुळे या अलायन्सच्या निधीवर आणि जागतिक प्रभावावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः हवामान बदलाच्या लढाईत अमेरिकेने घेतलेली ही माघार जगासाठी चिंतेचा विषय ठरू शकते.