Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 21:27 IST2025-07-28T21:21:23+5:302025-07-28T21:27:20+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला युक्रेनविरुद्ध युद्ध थांबवण्यासाठी शेवटची संधी दिली आहे.

Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला युक्रेनविरुद्ध युद्ध थांबवण्यासाठी शेवटची संधी दिली आहे. युक्रेनवरील हल्ले थांबवण्यासाठी रशियाकडे फक्त १० ते १२ दिवस आहेत, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. शिवाय, ते पुतिन यांच्यावर खूप नाराज आहेत आणि त्यांच्याशी बोलू इच्छित नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सोमवारी स्कॉटलंडमध्ये पत्रकारांशी बोलताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, "मी पुतिन यांच्याशी अनेकदा चर्चा केली आहे. नेहमीच आमच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर मला नेहमी असे वाटायचे की, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपले आहे. पण त्यानंतर पुतिन हे युक्रेनवर हल्ला करतात."
पुढे ट्रम्प म्हणाले की, "मी पुतिन यांच्यावर खूप नाराज आहे. मी त्यांना युद्ध थांबवण्यासाठी दिलेली ५० दिवसांची मुदत कमी करत आहे. कारण, पुढे काय होणार आहे, याची मला चांगली कल्पना आहे. त्यामुळे वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही. पुढील १० ते १२ दिवसांत रशियाने युद्ध संपवावे, अशी आमची इच्छा आहे. पण अद्यापही रशियाकडून कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया आली नाही."
याआधी ट्रम्प यांनी रशियाला युद्ध थांबवण्यासाठी ५० दिवसांची मुदत दिली होती. या कालावधीत रशियाने क्रेनवर हल्ला थांबवला नाही तर, अमेरिका रशियावर १०० टक्के कर लादेल. दरम्यान, ट्रम्प यांनी युक्रेनला मदत करण्यासाठी पॅट्रियट एअर डिफेन्स सिस्टम पुरवण्याची घोषणाही केली होती. मात्र, अजूनही रशियाकडून कोणाताही प्रतिसाद न मिळल्याने ट्रम्प यांनी त्यांना दिलेली मुदत कमी केली आहे.