इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 09:05 IST2026-04-30T09:02:45+5:302026-04-30T09:05:02+5:30
इराणने अणुकार्यक्रम शांततापूर्ण असल्याचा दावा केला, तरी उच्च पातळीवरील युरेनियम संपृक्तीकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संशय कायम आहे.

इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
दुबई - “इराणने लवकर शहाणे व्हावे,” असा स्पष्ट आणि कडक इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्याने अमेरिका-इराण यांच्यातील तणाव पुन्हा तीव्र झाला. अणुकराराबाबत ठोस प्रगती न झाल्यामुळे ट्रम्प यांनी इराणवर थेट टीका केली.
‘ट्रुथ सोशल’वर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले, “इराणला अजूनही अण्वस्त्रविरहित करार कसा करायचा हे कळत नाही. त्यांनी लवकर शहाणे व्हावे.” या वक्तव्यामुळे दोन्ही देशांतील तणाव अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या संघर्षानंतर युद्धविराम लागू असला, तरी दोन्ही बाजूंमध्ये विश्वासाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. इराणने अणुकार्यक्रम शांततापूर्ण असल्याचा दावा केला, तरी उच्च पातळीवरील युरेनियम संपृक्तीकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संशय कायम आहे.
युरोपला दररोज ६०० दशलक्ष डॉलर्सचा बसतोय फटका
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सांगितले की, त्यांच्या देशाचा साप्ताहिक तेल आयात खर्च ३०० दशलक्ष डॉलर्सवरून ८०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढला आहे, म्हणजेच सुमारे १६७ टक्क्यांची वाढ झाली आहे. युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन डेर लेयेन यांनी सांगितले की, अमेरिका-इस्रायल संघर्ष व इराणच्या प्रत्युत्तरात्मक कारवायांमुळे युरोपियन युनियनला दररोज सुमारे ५०० दशलक्ष युरो (६०० दशलक्ष डॉलर्स) इतका फटका बसत आहे.