पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 19:18 IST2026-05-02T19:01:26+5:302026-05-02T19:18:51+5:30
पाकिस्तानमध्ये तेलाचा केवळ ५ दिवसांचा साठा शिल्लक असून पेट्रोलच्या किमती ४५८ रुपयांवर पोहोचल्या आहेत.

पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
भारताचा शेजारी देश पाकिस्तान सध्या इतिहासातील सर्वात भीषण ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. एकीकडे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असताना, पाकिस्तानकडे आता केवळ ५ ते ७ दिवसांचाच तेलाचा साठा शिल्लक राहिला आहे. पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनी स्वतः ही धक्कादायक कबुली दिली असून, "आमच्याकडे भारतासारखे धोरणात्मक तेल साठे नाहीत," अशी हतबलता व्यक्त केली आहे.
पेट्रोलच्या किमतीत ४२ टक्क्यांची दरवाढ
मध्य पूर्वेतील तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदीमुळे पाकिस्तानची पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडली आहे. याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे. पाकिस्तानात पेट्रोलच्या किमतीत एका झटक्यात ४२.७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे ३२१.१७ रुपये प्रति लिटर मिळणारे पेट्रोल आता ४५८.४१ रुपयांवर पोहोचले आहे. इंधनाच्या या दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला असून जनता रस्त्यावर उतरली आहे.
भारताचे उदाहरण देत व्यक्त केली हतबलता
एका टीव्ही मुलाखतीत बोलताना मलिक यांनी भारताचे कौतुक करतानाच पाकिस्तानच्या दुरावस्थेवर बोट ठेवले. ते म्हणाले, "भारताकडे सुमारे ६० ते ७० दिवसांचा तेल साठा उपलब्ध आहे. त्यांच्याकडे केवळ ६०० अब्ज डॉलर्सची परकीय चलन गंगाजळीच नाही, तर त्यांनी संकटकाळासाठी मोठे धोरणात्मक साठेही तयार ठेवले आहेत. या दुहेरी लाभामुळेच जागतिक संकटाचा भारतावर कोणताही परिणाम होत नाही." याउलट पाकिस्तानकडे केवळ व्यावसायिक साठा असून तोही संपण्याच्या मार्गावर असल्याने देशात अंधकारमय परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
डिझेलच्या किमतीत ३-४ पट वाढ
पाकिस्तानात केवळ पेट्रोलच नाही तर डिझेलच्या किमतीतही ३ ते ४ पटीने वाढ झाली आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की, सरकारने डिझेलवरील लेव्ही शून्य करून सर्व बोजा पेट्रोलवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आयएमएफसोबत गुप्त चर्चा करून लेव्हीमध्ये ८० रुपयांची कपात करण्यास त्यांना राजी केल्याचेही मलिक यांनी सांगितले.
भारतात मात्र चित्र पूर्णपणे वेगळं
एकीकडे पाकिस्तान ४५० रुपयांच्या पेट्रोलसाठी रडत असताना, भारतात मात्र परिस्थिती पूर्णपणे स्थिर आहे. भारतात सध्या पेट्रोल ९४.७७ रुपये आणि डिझेल ८७.६७ रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. भारताकडे सध्या ६० दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा आणि ८ लाख टन एलपीजीचा साठा सुरक्षित असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.