पाकिस्तानने अजरबैजानला विकली भंगार हत्यारं; युक्रेन आणि सौदीलाही गंडा, रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 16:25 IST2026-02-09T16:21:26+5:302026-02-09T16:25:44+5:30

आर्थिक डबघाईला आलेला पाकिस्तान आता शस्त्रास्त्र विक्रीच्या नावाखाली जगाची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.

Pakistan sold scrap weapons to Azerbaijan; Ukraine and Saudi Arabia also cheated, major revelation in report | पाकिस्तानने अजरबैजानला विकली भंगार हत्यारं; युक्रेन आणि सौदीलाही गंडा, रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

पाकिस्तानने अजरबैजानला विकली भंगार हत्यारं; युक्रेन आणि सौदीलाही गंडा, रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

आर्थिक डबघाईला आलेला पाकिस्तान आता शस्त्रास्त्र विक्रीच्या नावाखाली जगाची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानकडून दारूगोळा आणि शस्त्रे खरेदी करणाऱ्या देशांची चिंता आता कमालीची वाढली आहे. एका नवीन अहवालानुसार, पाकिस्तानने अजरबैजानला पुरवलेला दारूगोळा केवळ निकृष्ट दर्जाचाच नाही, तर अनेक दशके जुना आणि गंजलेला असल्याचे उघड झाले आहे. या खुलाशामुळे जागतिक स्तरावर पाकिस्तानच्या डिफेंस एक्सपोर्टची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे.

अजरबैजानच्या विश्वासाला तडा

आर्मेनियासोबतच्या तणावामुळे अजरबैजान आपला मित्र देश असलेल्या पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे खरेदी करतो. मात्र, पाकिस्तानने या मैत्रीचा फायदा घेत अजरबैजानला चक्क गंजलेले गोळे धाडले आहेत. पाकिस्तानकडून आलेल्या शस्त्रास्त्रांमध्ये गंज लागणे, प्रोपेलेंट लोडमध्ये कमतरता आणि चुकीची मापे यांसारख्या गंभीर त्रुटी आढळल्या आहेत.

रेंजमध्येही मोठी फसवणूक

केवळ गुणवत्ताच नाही, तर तांत्रिक क्षमतेबाबतही पाकिस्तानने अजरबैजानची दिशाभूल केली आहे. पाकिस्तानने तोफेच्या गोळ्यांची जी रेंज सांगितली होती, प्रत्यक्षात युद्धाच्या मैदानात ते गोळे केवळ ४० ते ६० टक्केच अंतर कापू शकले आहेत. म्हणजेच, शत्रूवर लांबून मारा करण्याचा अजरबैजानचा डाव पाकिस्तानच्या निकृष्ट शस्त्रांमुळे सपशेल फसला आहे.

युक्रेन आणि सौदी अरबलाही बसलाय फटका!

पाकिस्तानच्या या ठकबाजीचा बळी केवळ अजरबैजानच ठरलेला नाही. रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनने पाकिस्तानकडून १५५ मिमीचे गोळे खरेदी केले होते. मात्र, हे गोळे तोफेच्या नळीतच वेळेआधी फुटल्याने युक्रेनच्या महागड्या तोफांचे नुकसान झाले.

एकेकाळी शस्त्रास्त्रांसाठी पाकिस्तानवर अवलंबून असलेला सौदी अरब आता सावध झाला आहे. पाकिस्तानची फसवणूक लक्षात आल्यानंतर सौदीने आता भारताकडून दारूगोळा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानातून येणाऱ्या शस्त्रास्त्रांचा हा भंगार दर्जा पाहता, आता इतर देशही पाकिस्तानशी संरक्षण करार करताना दहावेळा विचार करतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Web Title: Pakistan sold scrap weapons to Azerbaijan; Ukraine and Saudi Arabia also cheated, major revelation in report