“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 22:35 IST2025-12-03T22:33:24+5:302025-12-03T22:35:11+5:30
Pakistan Imran Khan News: असीम मुनीर हा कट्टर इस्लामिक रूढीवादी आहे, तर इम्रान खान हा शुद्ध उदारमतवादी आहे, असे अलीम खान यांनी म्हटले आहे.

“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
Pakistan Imran Khan News: पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर एक कट्टरपंथी इस्लामी आहे, जो भारतासोबत मोठे युद्ध करू इच्छितो. असीम मुनीर हा इस्लामिक रूढीवादी आहे, तर इम्रान खान हा शुद्ध उदारमतवादी आहे, असे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची बहीण अलीमा खान यांनी म्हटले आहे. एका मुलाखतीत बोलताना अलीमा खान यांनी असीम मुनीर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या एका बहिणीला तुरुंगात जाऊन इम्रान खान यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाल्याचे दावे अलीकडेच मोठ्या प्रमाणावर करण्यात आले होते. यानंतर पाकिस्तानसह जगभरात खळबळ उडाली होती. इम्रान खान यांच्या समर्थकांनी पाकिस्तान सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. गेल्या काही दिवसांपासून इम्रान खान यांच्याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. अशातच अलीमा खान यांनी मुलाखतीत केलेली विधाने लक्षवेधी ठरत आहेत.
इम्रान खान हा खरा उदारमतवादी आहे
अलीमा यांनी सांगितले की, असीम मुनीर हा अतिरेकी धार्मिक विचारांचा कट्टरपंथी इस्लामी आहे. म्हणूनच तो भारतासोबत युद्ध करू इच्छितो. त्याचे विचार कट्टरपंथी आहेत. यामुळे तो त्याचे विचार न मानणाऱ्यांना लढण्यास प्रेरित करतो. माझा भाऊ इम्रान खान नेहमीच भारताशी संबंध सुधारू इच्छित होता. इम्रान खान हा खरा उदारमतवादी आहे. जेव्हा तो सत्तेत आला, तेव्हा त्याने भारताशी आणि अगदी भाजपाशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. परंतु, जेव्हा असीम मुनीरसारखा कट्टरपंथी इस्लामी सत्तेत आला, तेव्हापासूनच भारताशी युद्धाच्या चर्चा वाढल्या आहेत, असा दावा अलीमा खान यांनी केला. तसेच तुरुंगात असलेल्या इम्रान खानच्या सुटकेसाठी पाश्चात्य देशांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन अलीमा यांनी केले.
दरम्यान, मुलाखतीत असा दावाही करण्यात आला होता की, असीम मुनीर लवकरच पाकिस्तानचे पहिले संरक्षण दल प्रमुख (सीडीएफ) बनतील. काश्मीर ही पाकिस्तानची श्वासनलिका आहे आणि मुस्लीम हिंदूंपेक्षा वेगळे आहेत, अशा असीम मुनीरच्या चिथावणीखोर विधानांमुळे एप्रिलमध्ये पहलगाम हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर भारताने मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ आणि ११ लष्करी ठिकाणांवर हल्ले करून प्रत्युत्तर दिले. यानंतर मुनीरची भाषा आणखी आक्रम झाली, असे सांगितले जात आहे.