शेख हसिना यांंच्या सरकारच्या पतनानंतर, भारत-बांगलादेश संबंध ताणले गेले आहेत. यातच आता बांगलादेशच्या एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने भारताविरुद्ध विषारी फुत्कार सोडले आहेत. बांगलादेशचे निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर जनरल अब्दुल्लाहिल अमान आजमी यांनी एका ऑनलाइन चर्चेदरम्यान गरळ ओकली आहे. "जोवर भारताचे तुकडे होत नाहीत, तोवर बांगलादेशात संपूर्ण शांतता येणार नाही, असे अब्दुल्लाहिल यांनी म्हटेल आहे. ते जमात-ए-इस्लामीचे प्रमुख राहिलेले गुलाम आझम यांचे पुत्र आहेत.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ढाका येथील नॅशनल प्रेस क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमात आजमी म्हणाले, भारत नेहमी बांगलादेशात अशांतता निर्माण करत असतो. यापूर्वीही त्यांनी अनेकदा भारताविरुद्ध भडकाऊ विधाने केली आहेत.
भारताविरुद्ध बोलताना त्यांनी भारतावर १९७५ ते १९९६ पर्यंत चटगांव हिल ट्रॅक्ट्स भागात अशांतता पसरवल्याचा आरोप केला. माजी अधिकाऱ्याने दावा केला की, "शेख मुजीबुर रहमान यांच्या सरकारच्या काळात पर्वतीय चटगांव जन संहती समिती (PCJSS) आणि तिची सशस्त्र शांती वाहिनी होती. भारताने त्यांना आश्रय, शस्त्रे आणि प्रशिक्षण दिले, यामुळे १९७५ ते १९९६ पर्यंत डोंगराळ भागात रक्तपात झाला."
आजमी यांचे वडील गुलाम आझम यांच्यावर १९७१ च्या युद्धात हिंदू आणि मुक्ती समर्थक बंगाली लोकांच्या नरसंहाराचे आरोप आहेत. सध्या बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. बांगलादेशात सध्या इस्लामी कट्टरतावादी शक्ती, उघडपणे धुडगूस घालताना दिसत आहेत आणि अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता शांतपणे सर्व तमाशा बघत आहेत.