वॉशिंग्टन/इस्लामाबाद : अमेरिका आणि इराणमधील अत्यंत कमकुवत असा युद्धविराम बुधवारी संपत असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे शिष्टमंडळ सोमवारी दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी पाकिस्तानात पोहोचत असल्याचे म्हटले आहे. इराणला दिलेला प्रस्ताव अत्यंत वाजवी आणि रास्त आहे, आता गोड बोलणे संपले, हा करार मान्य न केल्यास विनाशकारी हल्ले करू, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.
इराणने मात्र, इस्लामाबाद येथे नियोजित असलेल्या या चर्चेसाठी आपले प्रतिनिधी पाठवण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत इराणविरुद्धची अमेरिकेने लादलेली नौदल नाकेबंदी कायम आहे, तोपर्यंत चर्चेसाठी पाकिस्तानात कोणतेही शिष्टमंडळ पाठवले जाणार नाही, असे इराणची सरकारी वृत्तसंस्था ‘तस्निम’ने म्हटले आहे. अमेरिकेकडून पहिल्या फेरीचे नेतृत्व केलेले उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स तसेच विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर हे शिष्टमंडळ दुसऱ्या फेरीतही कायम आहे. हे शिष्टमंडळ सोमवारी इस्लामाबादमध्ये पोहोचत आहे.
भारतीय टँकर ‘होर्मुझ’च्या बाहेर
होर्मुझच्या सामुद्रधुनीत शनिवारी गोळीबारानंतर दोन भारतीय व्यापारी जहाजे माघारी फिरली असली, तरी एक भारतीय कच्च्या तेलाचा टँकर मात्र हा मार्ग सुरक्षितपणे ओलांडण्यात यशस्वी ठरला आहे. ‘देश गरिमा’ हे ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’चे जहाज ३१ भारतीय खलाशांसह १८ एप्रिल रोजी होर्मुझ ओलांडून पुढे गेले. हे जहाज २२ एप्रिलपर्यंत मुंबईत पोहोचेल.
‘प्रत्येक ऊर्जा प्रकल्प, पूल उद्ध्वस्त करू’
- ट्रम्प यांनी रविवारी ‘ट्रूथ सोशल’वर पोस्ट करत इराणला पुन्हा कडक शब्दांत तंबी दिली आहे. आता गोड बोलणे संपले असून, इराणने आमचा प्रस्ताव अमान्य केल्यास अमेरिका इराणमधील प्रत्येक विद्युत प्रकल्प आणि प्रत्येक पूल उद्ध्वस्त करेल, अशी धमकी त्यांनी दिली.
- इराण असाही खिळखिळा झाला आहे. त्यांनी करार स्वीकारला नाही तर ते सहज कोसळतील. करारासाठी जे आवश्यक आहे ते करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. गेल्या ४७ वर्षांत इतर राष्ट्राध्यक्षांनी जे करायला हवे होते ते केले नाही, असेही ट्रम्प म्हणाले.
भारताबाबत प्रश्न, ट्रम्प म्हणाले, गेट आऊट
होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन जहाजांवर इराणने केलेल्या हल्ल्याबाबत महिला पत्रकाराने प्रश्न विचारताच डोनाल्ड ट्रम्प यांनी तिला बाहेर जा असे म्हणत पत्रकार परिषद संपविली. सीबीएस न्यूजच्या प्रतिनिधी ऑलिव्हिया रिनाल्डी यांनी भारताच्या जहाजावर झालेल्या हल्ल्याबाबत ट्रम्प यांना प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देण्याऐवजी ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आणि सर्व पत्रकारांना तातडीने बाहेर जाण्याचे आदेश दिले.
Web Summary : Trump warns Iran to accept a 'fair' deal or face devastating attacks. Iran refuses talks until the US lifts naval blockade. An Indian tanker safely crossed Hormuz Strait, amidst tensions.
Web Summary : ट्रम्प ने ईरान को 'उचित' समझौते को स्वीकार करने या विनाशकारी हमलों का सामना करने की चेतावनी दी। ईरान ने अमेरिकी नौसेना नाकाबंदी हटने तक वार्ता से इनकार किया। तनाव के बीच एक भारतीय टैंकर होर्मुज जलडमरूमध्य से सुरक्षित रूप से गुजरा।