जिमी किमेलच्या कॉमेडीनं मेलानिया ट्रम्प संतप्त; "तुम्ही खूप सुंदर दिसत आहात, जसं की..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 08:15 IST2026-04-30T08:14:33+5:302026-04-30T08:15:03+5:30
गेल्या आठवड्यात ‘जिमी किमेल लाइव्ह’ या लोकप्रिय टॉक शोच्या भागात कॉमेडियन जिमी किमेलनं कॉमेडी मोनोलॉग सादर करत आपल्या नेहमीच्या उपरोधिक शैलीत डिनर कार्यक्रमाची खिल्ली उडवली होती

जिमी किमेलच्या कॉमेडीनं मेलानिया ट्रम्प संतप्त; "तुम्ही खूप सुंदर दिसत आहात, जसं की..."
अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये व्हाइट हाउस डिनर पार्टीत नुकत्याच झालेल्या गोळीबारात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प बालंबाल बचावले. या घटनेनं अमेरिका आणि संपूर्ण जगात खळबळ माजली आहे; पण, या घटनेपेक्षाही काही दिवस आधी घडलेल्या एका प्रसंगानं मात्र मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प प्रचंड संतापले आहेत.
गेल्या आठवड्यात ‘जिमी किमेल लाइव्ह’ या लोकप्रिय टॉक शोच्या भागात कॉमेडियन जिमी किमेलनं कॉमेडी मोनोलॉग सादर करत आपल्या नेहमीच्या उपरोधिक शैलीत डिनर कार्यक्रमाची खिल्ली उडवली होती. अमेरिकन मीडिया रिपोर्टनुसार, एबीसीचा होस्ट जिमी किमेल म्हणाला, ‘आपल्या फर्स्ट लेडी मेलानिया इथे आहेत. तुम्ही खूप सुंदर दिसत आहात, जसं की एखादी गर्भवती विधवा!’
आपल्याला ‘गर्भवती विधवा’ म्हटल्यानं फर्स्ट लेडी प्रचंड संतापल्या. ट्रम्प यांनीही होस्टला सुनावलं. म्हणाले, ‘याला तातडीनं हटवा..’ मेलानिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटलं, ‘ही कुठली कॉमेडी? माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबाबद्दल असं बोलणं कुठल्या कॉमेडीत मोडतं? जिमीचे शब्द अत्यंत हानिकारक आहेत. सध्या अमेरिकेमध्ये पसरलेल्या या राजकीय आजाराला तो आणखी बळकटी देतो आहे. जिमीसारख्या लोकांना दर संध्याकाळी आपल्या घरात घुसून द्वेष पसरवायची संधी मिळू नये. भ्याड किमेल एबीसीच्या मागे लपला आहे; कारण त्याला माहीत आहे की एबीसीचं नेटवर्क त्याला वाचवण्यासाठी त्याच्या बाजूनं उभं राहील. आता खूप झालं. जिमीच्या या घाणेरड्या वर्तनाला एबीसीचं नेतृत्व किती वेळा सहन करीत राहणार?’
त्यानंतर थोड्याच वेळात डोनाल्ड ट्रम्प यांनीही ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये हिलं, जिमीच्या हिंसा भडकवणाऱ्या घृणास्पद वक्तव्यांमुळे अनेक लोक दुखावले आहेत. साधारणपणे मी त्याच्या कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाही; पण, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. जिमी किमेलला डिस्नी आणि एबीसीनं तत्काळ बडतर्फ केलं पाहिजे. जिमीनं याआधीही ट्रम्प यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. जिमीनं म्हटलं होतं, डोनाल्ड ट्रम्प आणि एपस्टीन यांच्या फाइलमधल्या प्रत्येक पानानंतर मी इतका काळा रंग कधीच पाहिलेला नाही. त्यानं असंही म्हटलं की, डोनाल्ड ट्रम्प अतिशय नाजूक आहेत. त्यांची त्वचा आतापर्यंतच्या कोणत्याही माणसापेक्षा सगळ्यात पातळ आहे..
गेल्या सप्टेंबरमध्ये एबीसीनं जिमीला निलंबित केलं होतं. ही कारवाई तेव्हा करण्यात आली होती, जेव्हा फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनचे अध्यक्ष आणि ट्रम्प समर्थक ब्रेंडन कार यांनी जिमी किमेलनं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल केलेल्या जोक्सबद्दल नेटवर्कला सूचना दिल्या होत्या. या घटनेनं मोठा वाद निर्माण झाला होता, ज्यामध्ये कार हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनात्मक अधिकारावर हल्ला करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, नंतर एबीसीनं जिमी किमेलला पुन्हा कामावर घेतलं होतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माध्यमांच्या भूमिकेवरून त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. सध्याच्या वादानं पुन्हा एकदा अमेरिकेतील राजकीय ध्रुवीकरण, माध्यमांची जबाबदारी आणि विनोदाच्या मर्यादा यांवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.