‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 09:28 IST2025-05-19T09:15:20+5:302025-05-19T09:28:35+5:30
भारतात २००५ (बंगळुरू हल्ला) ते २००८ (रामपूर हल्ला) या कालावधीत झालेल्या हल्ल्यांत अनेकांचे प्राण गेले.

‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
इस्लामाबाद : २००६ च्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयासह भारतातील अनेक हल्ल्यांचा कट रचणारा दहशतवादी सैफुल्लाह खालिदची पाकिस्तानातील सिंध प्रांतात रविवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतात २००५ (बंगळुरू हल्ला) ते २००८ (रामपूर हल्ला) या कालावधीत झालेल्या हल्ल्यांत अनेकांचे प्राण गेले.
विनोद कुमार हाच खालिद
नेपाळमध्ये विनोद कुमार हे नाव धारण करून कित्येक वर्षे खालिद राहत होता. मूळ ओळख लपवून त्याने तेथे नगमा बानू या महिलेशी विवाहही केला होता. नेपाळमधूनच तो सर्व कारवाया हाताळत असल्याचा बऱ्याच वर्षांपासून सुरक्षा दलांना संशय होता. ‘लष्कर’च्या भरतीत त्याची भूमिका महत्त्वाची होती.
अशातच सिंधमध्ये आला आणि... : नेपाळमध्ये राहून कारवाया केल्यानंतर अशातच खालिदने आपला तळ पाकिस्तानात सिंध प्रांतात हलवला होता. लष्कर-ए-तोयबासह जमात-उद-दवा या संघटनांसाठी निधी जमवण्याच्या कामी तो सिंधमध्ये सतत कार्यरत होता. अज्ञात हल्लेखोरांनी अखेर त्याला टिपले.