इराणचे इस्रायल, आखाती देशांवर नवे हल्ले; मध्य-पूर्वेत तणाव कायम; इराणचा युद्धविरामाला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 05:26 IST2026-03-11T05:26:25+5:302026-03-11T05:26:44+5:30

आक्रमण करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा इशारा; इस्रायलचेही हल्ले

Iran's new attacks on Israel, Gulf countries; Tensions continue in the Middle East; Iran rejects ceasefire | इराणचे इस्रायल, आखाती देशांवर नवे हल्ले; मध्य-पूर्वेत तणाव कायम; इराणचा युद्धविरामाला नकार

इराणचे इस्रायल, आखाती देशांवर नवे हल्ले; मध्य-पूर्वेत तणाव कायम; इराणचा युद्धविरामाला नकार

दुबई : इस्रायलशी सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने मंगळवारी इस्रायलसह काही आखाती देशांवर नव्याने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. दुबई, बहरिनवर हल्ला होणार म्हणून सायरन वाजविण्यात आले, तर सौदी अरेबियाने आपल्या तेलसमृद्ध पूर्व भागावर येणारे दोन ड्रोन पाडल्याचा दावा केला. कुवेतनेही सहा ड्रोन नष्ट केल्याचे म्हटले आहे. जेरुसलेम व तेल अवीवमध्येही सायरन वाजल्याने स्फोटांचे आवाज ऐकू आले. या हल्ल्यांमध्ये किती जीवितहानी याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेली नाही. 

युद्धाची स्थिती आणि तेल बाजारावर परिणाम

इराणने इस्रायल, अमेरिकेचे लष्करी तळ आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले सुरू ठेवले. होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाज वाहतुकीवर परिणाम झाल्याने तेल पुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे. ब्रेंट क्रूडची किंमत सोमवारी जवळपास १२० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचली; मंगळवारी ती सुमारे ९० डॉलरवर होती. युद्ध सुरू झाल्यापासून तेलाच्या किमती सुमारे २४ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

‘आक्रमण करणाऱ्याला धडा शिकवू’

इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बाकर कालीबाफ यांनी युद्धविरामास नकार देत आक्रमण करणाऱ्याला धडा शिकवू, असे वक्तव्य केले आहे. 

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणवरील कारवाया सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध कदाचित अल्पकालीन राहील असे विधान केले आहे. 

इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्ला संघटनेच्या आर्थिक नेटवर्कवर हल्ले केल्याचा दावा केला.

इराण महिला फुटबॉल संघातील खेळाडूंना ऑस्ट्रेलियात आश्रय

ब्रिस्बेन : इराणमधील युद्ध सुरू असताना ऑस्ट्रेलियात स्पर्धेसाठी आलेल्या इराण महिला फुटबॉल संघातील पाच खेळाडूंना आश्रय देण्यात आला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या सरकारने २६ सदस्यांच्या संपूर्ण संघाला आश्रय देऊ असे आश्वासन दिले आहे. 

या खेळाडूंनी पहिल्या सामन्यापूर्वी इराणचे राष्ट्रगीत म्हटले नव्हते. त्यामुळे ऑस्ट्रेलियात या घटनेच्या मोठ्या प्रमाणावर बातम्या झाल्या होत्या. महिला आशियाई कपसाठी २६ खेळाडू आले असून स्पर्धेतून बाहेर पडल्यावर त्यांना युद्धग्रस्त इराणमध्ये परतावे लागण्याची शक्यता आहे.

इराणमध्ये काळ्या अम्लीय पावसाची हजेरी

मेलबर्न : इराणच्या काही भागात काळ्या रंगाचा अम्लीय पाऊस पडला. काही शास्त्रज्ञांनी या पावसात सल्फ्युरिक व नायट्रिक अम्लासोबत इतर हानिकारक रसायनेही होती असे म्हटले आहे. हा पाऊस नागरिकांसाठी धोकादायक असून, त्याने डोकेदुखी श्वसनाचे गंभीर आजार, अस्थमा बळावू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. धुरामुळे निर्माण झालेले प्रदूषक जलस्रोत प्रदूषित करत आहेत.

ट्रम्प-पुतिन यांची चर्चा; इराण, युक्रेन युद्धावर संवाद

मॉस्को : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या संभाषणात इराणमधील संघर्ष आणि रशिया-युक्रेन युद्ध या दोन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली. रशिया-अमेरिका-युक्रेन या त्रिपक्षीय चर्चेचाही आढावा घेण्यात आला. 

'भारताला तेलपुरवठा करा'

ट्रम्प यांनी फोन करण्याच्या काही तास आधी पुतिन यांनी ऊर्जा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रशिया मित्रदेशांसाठी विश्वासार्ह ऊर्जा पुरवठादार असल्याचे सांगितले. भारत आणि चीनसारख्या देशांना तेल-गॅस पुरवठा सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी मांडली. पश्चिम आशियातील संघर्षामुळे आणि होर्मुझ सामुद्रधुनी जवळपास बंद झाल्यामुळे जागतिक तेल-गॅस पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता पुतिन यांनी व्यक्त केली. 

ट्रम्पना दिली धमकी

दुबई : इराणचे वरिष्ठ नेते अली लारिजानी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सोशल मीडियावरून धमकी दिली. इराण तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही. अनेक प्रभावशाली शक्तींना इराणला पराभूत करता आलेले नाही. आपण स्वतः नष्ट होऊ नये अशी काळजी घ्यावी, असे लारिजानी यांनी ट्रम्पना म्हटले. 

Web Title : ईरान का इस्राइल, खाड़ी देशों पर हमला; मध्य पूर्व में तनाव; युद्धविराम नहीं

Web Summary : ईरान ने इस्राइल और खाड़ी देशों पर मिसाइल और ड्रोन हमले किए, जिससे मध्य पूर्व में तनाव बढ़ गया। जहाजों की आवाजाही बाधित होने से तेल की कीमतें बढ़ीं। ईरान ने युद्धविराम से इनकार किया, जबकि इस्राइल ने कार्रवाई जारी रखने की कसम खाई। ट्रम्प और पुतिन ने संकट पर चर्चा की।

Web Title : Iran Attacks Israel, Gulf States; Middle East Tension High; No Ceasefire

Web Summary : Iran launched missile and drone attacks on Israel and Gulf states, escalating Middle East tensions. Oil prices surged amid disrupted shipping. Iran rejects ceasefire calls, while Israel vows continued action. Trump and Putin discussed the crisis.