'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 21:03 IST2026-01-12T21:02:11+5:302026-01-12T21:03:25+5:30
Iran Protests: इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी हस्तक्षेपाची धमकी दिली आहे.

'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
Iran-America: इराणमध्ये सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी लष्करी हस्तक्षेपाची धमकी दिल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव अधिकच वाढला आहे. या घडामोडींनंतर एकीकडे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई(Ayatollah Ali Khamenei) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे चर्चेची दारेही उघडी ठेवली आहेत.
युद्ध नको, पण तयारी पूर्ण
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागच्ची यांनी सोमवारी (12 जानेवारी 2026) तेहरानमध्ये विदेशी राजदूतांच्या परिषदेला संबोधित करताना म्हटले की, आम्ही युद्धासाठी इच्छित नाही, मात्र युद्ध झालेच, तर पूर्णपणे सज्ज आहोत. इराण अमेरिकेसोबत चर्चेसाठी तयार आहे, मात्र ही चर्चा निष्पक्ष, समान हक्कांवर आधारित आणि परस्पर सन्मानातून झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
अराघची यांनी आरोप केला की, देशातील आंदोलनांना हिंसक वळण देण्यात आले, जेणेकरून ट्रम्प प्रशासनाला हस्तक्षेप करण्याचे कारण मिळावे. त्यांच्या मते, सरकारने परिस्थिती आता पूर्णतः नियंत्रणात आणली आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बगाई यांनीही सांगितले की, इराणचे परराष्ट्र मंत्री आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे विशेष दूत यांच्यात संवादाचे माध्यम खुले आहे.
ट्रम्पचाही अंत होईल...
एकीकडे इराणने चर्चेसाठी दार खुले असल्याचे म्हटले, तर दुसरीकडे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, फिरौन, निमरूद, रझा शाह आणि मोहम्मद रझा शाह यांसारखे हुकूमशहा अहंकाराच्या शिखरावरून कोसळले. ट्रम्प यांचाही अंत अटळ आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही देशांतील वाकयुद्ध आणखी तीव्र झाले आहे.
सरकार समर्थक रस्त्यावर; अमेरिकेला इशारा
देशव्यापी आंदोलनांनंतर इराणमध्ये हजारो सरकार समर्थक रस्त्यावर उतरले आणि सत्तेच्या समर्थनार्थ शक्तीप्रदर्शन केले. इराणी संसदेच्या अध्यक्षांनी स्पष्ट इशारा दिला की, जर अमेरिकेने या आंदोलनांच्या नावाखाली इराणवर हल्ला केला, तर अमेरिकन सैन्य आणि इस्रायल आमच्या निशाण्यावर असतील. स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी इराणमध्ये 84 तासांहून अधिक काळ इंटरनेट बंद ठेवण्यात आले आहे.