भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानची झोप उडाली; युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेत ओतले कोट्यवधी रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 08:45 IST2026-01-08T08:44:20+5:302026-01-08T08:45:01+5:30
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पुरता हादरलेल्या पाकिस्तानने हे युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेत धाव घेतली होती.

भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानची झोप उडाली; युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेत ओतले कोट्यवधी रुपये!
भारताच्या सामर्थ्यापुढे पाकिस्तानची कशी दाणादाण उडते, याचा आणखी एक खळबळजनक पुरावा समोर आला आहे. भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पुरता हादरलेल्या पाकिस्तानने हे युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेत धाव घेतली होती. विशेष म्हणजे, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था आणि गरिबीशी झुंजणाऱ्या पाकिस्तानने अमेरिकन नेत्यांचे पाय धरण्यासाठी आणि भारताच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यासाठी दरमहा तब्बल ४५ लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
काय आहे 'ऑपरेशन सिंदूर'चा धसका?
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारतीय लष्कराच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तान प्रचंड दबावाखाली होता. भारताची कारवाई कधीही निर्णायक वळण घेऊ शकते, या भीतीपोटी पाकिस्तानने अमेरिकेतील प्रभावशाली राजकारण्यांशी संपर्क साधण्यासाठी 'लॉबिंग'चा आधार घेतला. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या कागदपत्रांमधून हा खुलासा झाला आहे की, वॉशिंग्टन डीसीमध्ये पाकिस्तानच्या बाजूने लॉबिंग करणाऱ्या कंपन्यांनी अमेरिकन खासदारांना साकडे घालण्यासाठी मोठी यंत्रणा राबवली होती.
ट्रम्प यांच्या माजी सुरक्षा रक्षकाची मदत
पाकिस्तानने आपली बाजू मांडण्यासाठी 'जुवेलियन अॅडव्हायझर्स'सारख्या बड्या फर्मची नियुक्ती केली होती. विशेष म्हणजे, या फर्मचे प्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी अंगरक्षक कीथ शिलर आणि ट्रम्प ऑर्गनायझेशनचे माजी कार्यकारी जॉर्ज सोरियल आहेत. पाकिस्तान या फर्मला दरमहा ५०,००० डॉलर्स (सुमारे ४५ लाख रुपये) मोजत होता. या फर्मने अमेरिकन संसदेतील दोन्ही सभागृहांच्या (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज आणि सिनेट) बड्या नेत्यांशी पाकिस्तानच्या वतीने चर्चा केली.
भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न
पाकिस्तानने केवळ लॉबिंगच केली नाही, तर भारतावर उलट आरोप करण्याचा डावही आखला होता. 'स्क्वेअर पॅटन बॉग्स' या लॉबिंग फर्मच्या माध्यमातून अमेरिकेत एक नोट प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये भारतावरच दहशतवादाला पाठबळ देत असल्याचा खोटा आरोप करण्यात आला होता. एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आमचा हात नसल्याचे भासवून अमेरिकेने या वादात मध्यस्थी करावी, यासाठी पाकिस्तानने अक्षरश: गयावया केली होती.
भारतापेक्षा पाकिस्तानचा खर्च तिप्पट
आश्चर्याची बाब म्हणजे, ज्या देशाकडे जनतेला खाऊ घालण्यासाठी पैसे नाहीत, तो देश लॉबिंगवर भारतापेक्षा तिप्पट खर्च करत आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, भारत आपल्या हितासाठी दोन फर्मवर दरमहा साधारण २ लाख डॉलर्स खर्च करत असताना, पाकिस्तानने सहा वेगवेगळ्या फर्मवर दरमहा ६ लाख डॉलर्स उधळले होते. भारताच्या वाढत्या प्रभावामुळे पाकिस्तानला आता जागतिक स्तरावर आपली बाजू मांडण्यासाठी केवळ पैशांचाच आधार उरला असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.