पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच अतिशय चर्चेत राहिले आहेत. क्रिकेटपटू असताना कर्णधार, गोलंदाज आणि अष्टपैलू म्हणून त्यांनी गाजवलेली कारकीर्द आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या खेळानं आणि त्यांच्या रुबाबदार, आकर्षक व्यक्तिमत्त्वानं अनेकांवर त्यांनी मोहिनी घातली होती. त्यामुळे त्या काळातही असंख्य महिला इमरान खान यांच्या चाहत्या होत्या. एवढंच नाही, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला भुलूनच त्याकाळच्या अनेक तरुणींनी क्रिकेटच्या मैदानावर पाय ठेवला होता, तर अनेकींनी क्रिकेट खेळात रस दाखवला होता.
इमरान खान यांची पहिली पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांच्याबरोबरचा त्यांचा विवाहही त्याकाळी प्रचंड गाजला होता. कालांतरानं हे नातं तुटलं. इमरान खान आता पाकिस्तानच्या जेलमध्ये आहेत, इमरान खान आणि जेमिमा यांना दोन मुलं असली, नात्यातून ते कधीच बाहेर पडले असले, तरी या दोघांचं, विशेषत: जेमिमा गोल्डस्मिथ यांचं नाव आता पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आहे. याचं कारण जेमिमा गोल्डस्मिथ वयाच्या ५२व्या वर्षी आता पुन्हा प्रेमात पडल्या असून, त्या लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. ६२ वर्षीय अब्जाधीश गुंतवणूकदार कॅमेरॉन ओ’रायली (Cameron O’Reilly) यांच्यासोबत वर्षभराहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी आता लग्नाचा निर्णय घेतला आहे.
डेली मेलच्या वृत्तानुसार दोघांचा साखरपुडाही झाला आहे. मागील एका वर्षापासून ते एकमेकांना डेट करत होते. सध्या हे जोडपं एकत्र राहतंय. कॅमेरॉन यांची जेमिमाशी ओळख त्यावेळी झाली, जेव्हा ते अनेक डॉक्युमेंटरी आणि चित्रपटांमध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करत होते. वृत्तानुसार हे जोडपं स्वित्झर्लंडमधील कॅमेरॉन यांच्या घरात आणि लंडनमधील जेमिमा यांच्या घरात वेळ घालवतं. जेमिमाच्या एका मित्राच्या हवाल्यानं डेली मेलनं म्हटलंय की, दोघांची पहिली भेट कामाच्या निमित्तानं झाली होती. सुरुवातीला ते काही काळ मित्र होते आणि मागील वर्षभराहून अधिक काळापासून कपल म्हणून एकत्र राहात आहेत.
कॅमेरॉन ओ’रायली हे आयरिश-ऑस्ट्रेलियन फायनान्सर आहेत. ते प्रसिद्ध माध्यमसम्राट आणि आंतरराष्ट्रीय रग्बी स्टार अँथनी ओ’रायली यांचे पुत्र आहेत. ऑक्सफर्डमधून पदवी घेतलेल्या ओ’रायली यांनी जवळपास दशकभर वडिलांच्या ‘इंडिपेंडंट न्यूज ॲण्ड मीडिया’ या मीडिया हाउसमध्ये काम केलं. २००० मध्ये त्यांनी सीईओपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर २००३ मध्ये त्यांनी ‘बेयार्ड कॅपिटल’ हा प्रायव्हेट इक्विटी फंड सुरू करून गुंतवणुकीच्या क्षेत्रात काम सुरू केलं.
जेमिमा गोल्डस्मिथ या दिवंगत अब्जाधीश फायनान्सर जेम्स गोल्डस्मिथ यांच्या कन्या आहेत. इमरान खान आणि जेमिमा यांना कासिम आणि सुलेमान हे दोन मुलगे आहेत. जेमिमा यांनी १९९५ मध्ये इमरान खान यांच्याशी विवाह केला होता. हा संसार ९ वर्षं टिकला आणि २००४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. इमरान खान २०२३ पासून रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात आहेत. सत्तेत असताना भ्रष्टाचार केल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. इमरान आणि जेमिमा विभक्त झाले असले, तरी इमरान खान यांच्या सुटकेसाठी त्या मोहीम चालवत आहेत.
Web Summary : Jemima Goldsmith, ex-wife of Imran Khan, is reportedly engaged to Cameron O'Reilly, a 62-year-old billionaire. After dating for over a year, the couple plans to marry. Goldsmith and O'Reilly met through work and have been spending time in Switzerland and London.
Web Summary : इमरान खान की पूर्व पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ कथित तौर पर 62 वर्षीय अरबपति कैमरन ओ'रेली से सगाई कर रही हैं। एक साल से अधिक समय तक डेटिंग करने के बाद, युगल शादी करने की योजना बना रहा है। गोल्डस्मिथ और ओ'रेली काम के माध्यम से मिले और स्विट्जरलैंड और लंदन में समय बिता रहे हैं।