भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 00:23 IST2025-05-10T00:04:21+5:302025-05-10T00:23:55+5:30
IMF 8500 Crore to Pakistan: भारताविरोधात शस्त्रास्त्रे मिळविण्यासाठी पाकिस्तान या पैशांचा वापर करणार आहे, हे नक्की आहे. आयएमएफने गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानसाठी प्रमाणाच्या बाहेर पैसा दिला आहे.

भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला युद्धाच्या तोंडावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २.३ अब्ज डॉलर्स एवढ्या मोठ्या किंमतीची दोन पॅकेज मंजूर केली आहेत. आयएमएफमध्ये भारताने हा पैसा पाकिस्तानला देण्यास विरोध केला होता, तसेच मतदानास अनुपस्थित राहिला होता. पाकिस्तान हा पैसा दहशतवाद्यांवर खर्च करणार असा इशारा भारताने दिला होता. धक्कादायक बाब म्हणजे आयएमएफकडून पाकिस्तानला तातडीने १ अब्ज डॉलर्स म्हणजेच ८,५०० कोटी रुपये दिले जाणार आहेत.
भारताविरोधात शस्त्रास्त्रे मिळविण्यासाठी पाकिस्तान या पैशांचा वापर करणार आहे, हे नक्की आहे. आयएमएफने गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानसाठी प्रमाणाच्या बाहेर पैसा दिला आहे. १ अब्ज डॉलर्स (८,५०० कोटी रुपये) एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी (EFA) अंतर्गत तात्काळ दिले जातील, तर १.३ अब्ज डॉलर्स (११,००० कोटी रुपये) कर्ज पुढील २८ महिन्यांत हप्त्यांमध्ये दिले जाणार आहे.
आयएमएफकडून पैसा मिळण्याचे समजताच पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे वक्तव्य आले आहे. 'पाकिस्तानसाठी आयएमएफने १ अब्ज डॉलर्सचा हप्ता मंजूर करणे हे भारताच्या दबाव धोरणाचे अपयश आहे, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या कार्यालयाकडून वक्तव्य प्रसारित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने पाकिस्तानला प्रस्तावित केलेल्या १.३ अब्ज डॉलर्सच्या बेलआउट पॅकेजवर मतदान करण्यापासून भारत दूर राहिला होता. भारताने पाकिस्तानकडून आयएमएफच्या मदत अटींची पूर्तता करण्यात वारंवार अपयश आल्याबद्दल चिंता व्यक्त केली. परंतू, तरीही आयएमएफने पाकिस्तानला पैसा दिला आहे.
पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदत अप्रत्यक्षपणे त्याच्या गुप्तचर संस्थांना आणि लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांना मदत करते, हे लोक भारतावर हल्ले करत असतात, असेही भारताने म्हटले होते.
भारत गैरहजर का राहिला...
पाकिस्तानला कर्ज मंजूर करण्याबाबतच्या आयएमएफच्या मतदानात भारताने गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला, कारण आयएमएफच्या नियमांनुसार औपचारिक "नाही" मत देण्याची परवानगी नाही.