धक्कादायक निष्कर्ष! ८० देशांतील वस्तुस्थितीचा अभ्यास, ‘जेन-झी’ ही पहिली 'अशी' पिढी ठरलीय की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 07:54 IST2026-02-09T07:53:49+5:302026-02-09T07:54:42+5:30

नवी पिढी आपल्या पालकांपेक्षा कमी बुद्धिमान! स्वीडनसारख्या देशांनी अलीकडेच शाळांमधून डिजिटल गॅजेट्स काढून टाकून पुन्हा कागद-पेन आणि छापील पुस्तकांकडे वळायचा निर्णय घेतला आहे.

Gen- Z has become the first generation whose intelligence (IQ level) is lower than that of their parents' generation, Report | धक्कादायक निष्कर्ष! ८० देशांतील वस्तुस्थितीचा अभ्यास, ‘जेन-झी’ ही पहिली 'अशी' पिढी ठरलीय की...

धक्कादायक निष्कर्ष! ८० देशांतील वस्तुस्थितीचा अभ्यास, ‘जेन-झी’ ही पहिली 'अशी' पिढी ठरलीय की...

तंत्रज्ञानानं आपलं आयुष्य खरंच खूपच सुकर केलेलं आहे. याच तंत्रज्ञानामुळे नवी पिढीही अत्यंत स्मार्ट झालेली दिसते आहे आणि त्यांच्या पालकांच्या पिढी तर अगदी ‘१८५७’ची वाटू लागली आहे ! या मुलांचं तंत्रज्ञानावरचं, संगणकावरचं, स्क्रीनवरचं कौशल्य पाहिलं की जुनी पिढी अक्षरश: तोंडात बोटं घालते आणि त्यांना वाटतं, आपली पोरं फारच हुशार आहेत, आपल्याला तर यातलं काहीही येत नाही! 

पण थांबा, इथेच संशोधकांनी धोक्याचा फार मोठा इशारा दिला आहे. त्यांच्या मते ‘जेन-झी’ ही पहिली अशी पिढी ठरली आहे, जिची बुद्धिमत्ता (आयक्यू स्तर) त्यांच्या आई-वडिलांच्या पिढीपेक्षा कमी आहे. त्यांचा मेंदू बोथट होत आहे. तब्बल ८० देशांतील वस्तुस्थितीचा अभ्यास आणि संशोधन करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. न्यूरो सायंटिस्ट डॉ. जॅरेड कुनी हॉरवाथ यांनी अमेरिकन सिनेटच्या समितीत यासंदर्भाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं, आजच्या, संपूर्ण जगभरातील नव्या पिढीचा आयक्यू दिवसेंदिवस कमी होत आहे, याचं कारण डिजिटल तंत्रज्ञानावरचं त्यांचं अतिअवलंबित्व! 

डॉ. हॉरवाथ सांगतात, १८०० च्या दशकाच्या उत्तरार्धानंतर पहिल्यांदाच एखाद्या पिढीचा आयक्यू, स्मरणशक्ती, लक्ष केंद्रीकरण, वाचन, गणित आणि समस्या सोडवण्याची क्षमता मागील पिढीपेक्षा कमी झाली आहे. माणसाचा मेंदू लहान व्हिडीओ आणि अतिशय संक्षिप्त वाक्यांतून शिकण्यासाठी बनलेला नाही. सखोल वाचन आणि समोरासमोर संवाद यातून माणूस जास्त चांगलं शिकतो, स्क्रीनवरून नाही. पण, मोबाइलसकट सर्व प्रकारच्या स्क्रीनच्या वापरामुळे २०१० नंतर मुलांची बौद्धिक क्षमता घटायला सुरुवात झाली. अनेक देश, तेथील पालक, शाळा, शिक्षक, सरकार या वस्तुस्थितीमुळे हादरले आहेत आणि येणारी पिढी कमी गुणवत्तेची निपजू नये, यासाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. याचाच परिणाम म्हणून अनेक युरोपीय देशांमधील शाळांमध्ये डिजिटल गॅजेट्सवर मर्यादा आणल्या गेल्या आहेत किंवा ही गॅजेट्स वापरायला मुलांना बंदी करण्यात आली आहे.

स्वीडनसारख्या देशांनी अलीकडेच शाळांमधून डिजिटल गॅजेट्स काढून टाकून पुन्हा कागद-पेन आणि छापील पुस्तकांकडे वळायचा निर्णय घेतला आहे. फ्रान्स, नेदरलँड्स, ब्रिटन, फिनलंडसारखे देशही शाळांमध्ये टॅब्लेट आणि लॅपटॉपच्या वापरावर मर्यादा घालत आहेत. युनेस्कोच्या अहवालातही याबाबत इशारा देण्यात आला आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, जेन-झीची सर्वात कमकुवत बाजू म्हणजे त्यांचा अति आत्मविश्वास. जेन-झीमधील तरुण आपल्या बुद्धिमत्तेबाबत गरजेपेक्षा जास्त आत्मविश्वासी आहेत. त्यांना स्वतःच्या मर्यादांची जाणीव नाही. त्यामुळेच जगभरातील शिक्षणतज्ज्ञांनी सुचवलं आहे की, मुलांना स्मार्टफोन एकतर देऊ नये किंवा तो त्यांच्या हाती येण्यासाठी जास्तीत जास्त उशीर करावा. तज्ज्ञांनी याला ‘सामाजिक आणीबाणी’, असं म्हटलं आहे.

या संशोधनाचा निष्कर्ष सांगतो की, मागील ६० वर्षांत जसंजसं शाळांमध्ये तंत्रज्ञान वाढलं, तसं-तसं मुलांची शिकण्याची क्षमता घटली. जे विद्यार्थी रोज पाच तास संगणकावर, स्क्रीनवर अभ्यास करतात किंवा वापरतात, त्यांचा स्कोअर तंत्रज्ञानाचा कमी किंवा अजिबात वापर न करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा बराच कमी आढळून आला आहे.

Web Title : डिजिटल निर्भरता के कारण जेन जेड का आईक्यू माता-पिता से कम: अध्ययन

Web Summary : 80 देशों के एक अध्ययन से पता चला है कि अत्यधिक डिजिटल तकनीक के उपयोग के कारण जेन जेड का आईक्यू घट रहा है। विशेषज्ञ बच्चों में सीखने और ध्यान केंद्रित करने में सुधार के लिए स्क्रीन टाइम को सीमित करने की वकालत करते हैं। स्कूल डिजिटल उपकरणों पर पुनर्विचार कर रहे हैं।

Web Title : Gen Z's IQ Lower Than Parents Due to Digital Reliance: Study

Web Summary : A study across 80 countries reveals Gen Z's IQ is declining due to excessive digital technology use. Experts warn about decreased cognitive skills and advocate for limiting screen time to improve learning and focus in children. Schools are reconsidering digital tools.