एपस्टीन प्रकरणाने अमेरिकन राजकारणात खळबळ, 'त्या' फाईल्सवर बंदीची मागणी; कोर्टात तातडीची सुनावणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 22:49 IST2026-02-03T22:46:50+5:302026-02-03T22:49:11+5:30
अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टीन प्रकरणाशी संबंधित ३० लाख फाईल्स सार्वजनिक केल्या, मात्र यामध्ये झालेल्या एका गंभीर चुकीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

एपस्टीन प्रकरणाने अमेरिकन राजकारणात खळबळ, 'त्या' फाईल्सवर बंदीची मागणी; कोर्टात तातडीची सुनावणी!
जेफ्री एपस्टीनशी संबंधित प्रकरणाने पुन्हा एकदा अमेरिकेसह संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने या प्रकरणाशी संबंधित ३० लाख फाईल्स सार्वजनिक केल्या, मात्र यामध्ये झालेल्या एका गंभीर चुकीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या फाईल्समध्ये अनेक पीडित महिला आणि अल्पवयीन मुलींची नावे कोणतीही गोपनीयता न राखता प्रसिद्ध झाली आहेत. या प्रकरणी आता अमेरिकन फेडरल कोर्टात तातडीने सुनावणी होणार असून, या फाईल्स हटवण्याची मागणी केली जात आहे.
काय आहे नेमका वाद?
गेल्या आठवड्यात अमेरिकन जस्टिस डिपार्टमेंटने एपस्टीन प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक केली होती. यात जगातील अनेक बड्या आणि प्रभावशाली व्यक्तींचे एपस्टीनशी असलेले संबंध समोर येणार होते. मात्र, ही कागदपत्रे प्रसिद्ध करताना त्यातील पीडितांची नावे लपवण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही. फ्लोरिडातील एका लॉ फर्मने कोर्टाला कळवले की, एका ईमेलमध्ये ३२ अल्पवयीन पीडितांची यादी होती, ज्यातील ३१ नावे स्पष्टपणे वाचता येत होती. एका पीडितेने तर तिचा घराचा पत्ताही सार्वजनिक झाल्याची तक्रार केली आहे.
कोर्टाची भूमिका आणि सरकारी स्पष्टीकरण
न्यायाधीश रिचर्ड एम. बर्मन या प्रकरणावर बुधवारी सुनावणी घेणार आहेत. वकिलांनी मागणी केली आहे की, जोपर्यंत सर्व गोपनीयता राखली जात नाही, तोपर्यंत वेबसाइटवरून या फाईल्स तातडीने हटवण्यात याव्यात. दुसरीकडे, न्याय विभागाने म्हटले आहे की, ते या चुका दुरुस्त करण्यासाठी आणि नावे लपवण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. काही फाईल्समध्ये आक्षेपार्ह फोटोही होते, जे आता हटवण्यात आले आहेत.
क्लिंटन दाम्पत्य देणार साक्ष!
या प्रकरणाने केवळ सामाजिकच नाही तर राजकीय वळणही घेतले आहे. अमेरिकन संसदेच्या चौकशी समितीसमोर माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी साक्ष देण्यास संमती दर्शवली आहे. सुरुवातीला त्यांनी नकार दिला होता, मात्र वाढता दबाव पाहता त्यांनी आता सहकार्य करण्याचे ठरवले आहे. रिपब्लिकन नेत्यांच्या मते, क्लिंटन कुटुंबाचे एपस्टीनशी जुने संबंध आहेत, त्यामुळे त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. तर डेमोक्रॅट्सनी या चौकशीला राजकीय सूडबुद्धी म्हटले आहे.
कोण होता जेफ्री एपस्टीन?
जेफ्री एपस्टीनवर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीचे गंभीर आरोप होते. २०१९ मध्ये तुरुंगात असतानाच त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प किंवा क्लिंटन कुटुंबावर कोणतेही थेट गुन्हेगारी आरोप नसले, तरी त्यांच्या नावांची चर्चा या फाईल्समुळे पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या प्रकरणातील पीडितांची ओळख उघड होणे, हा त्यांच्यावरील अन्यायाचा दुसरा प्रकार असल्याची भावना अमेरिकेतील मानवाधिकार संघटनांनी व्यक्त केली आहे.