दक्षिण चीनच्या ग्वांग्शी स्वायत्त प्रदेशात सोमवारी पहाटे शक्तिशाली भूकंप झाला. यामुळे सर्वत्र घबराट पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, ५.२ तीव्रतेच्या या भूकंपात किमान दोन जणांचा मृत्यू झाला असून, एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. इतर अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआ आणि सरकारी मालकीच्या सीसीटीव्हीनुसार, सोमवारी पहाटे १२.२१ वाजता लिउझोऊ शहरातील लिउनान जिल्ह्यात भूकंप झाला. याचे केंद्र ताईयांगचुन शहराजवळ होते. भूकंपाची खोली केवळ ८ किलोमीटर असल्याचे सांगण्यात आले, यामुळे भूकंपाचे धक्के खूप तीव्र होते.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे १३ इमारती कोसळल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ७,००० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. परिसरातील अनेक घरे आणि इमारतींचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. बाधित भागांमध्ये मदत आणि बचाव पथके आपले कार्य सुरू ठेवत आहेत.
चार जणांना रुग्णालयात केले दाखल
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. भूकंपाचा धक्का केवळ लिउझोऊ शहरापुरता मर्यादित नव्हता. ग्वांग्शी प्रदेशातील नानिंग आणि गुइलिनसह अनेक प्रमुख शहरांनाही भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री उशिरा झालेल्या या धक्क्यांमुळे घाबरलेले रहिवासी आपापल्या घरातून बाहेर धावले.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूकंपानंतर रेल्वे मार्गांवर सुरक्षा तपासणी केली जात आहे. यामुळे काही गाड्यांच्या वाहतुकीत व्यत्यय येऊ शकतो आणि प्रवाशांना विलंब होऊ शकतो. वीज, पाणी, गॅस आणि दूरसंचार यांसारख्या अत्यावश्यक सेवा सामान्यपणे सुरू आहेत.
Web Summary : A 5.2 magnitude earthquake struck Guangxi, China, killing two and leaving one missing. Thirteen buildings collapsed, and over 7,000 people were evacuated. Rescue operations are underway as the quake impacted multiple cities, causing widespread panic and disruption to transportation.
Web Summary : चीन के गुआंग्शी में 5.2 तीव्रता का भूकंप आया, जिसमें दो लोगों की मौत हो गई और एक लापता है। तेरह इमारतें ढह गईं, और 7,000 से अधिक लोगों को निकाला गया। कई शहरों में भूकंप से दहशत और परिवहन बाधित हुआ, बचाव कार्य जारी है।