"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 23:03 IST2025-10-13T22:59:41+5:302025-10-13T23:03:44+5:30
पाकिस्तान- अफगाणिस्तान सीमेवर जोरदार गोळीबार आणि चकमकींमुळे दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे.

"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
पाकिस्तान- अफगाणिस्तान सीमेवर जोरदार गोळीबार आणि चकमकींमुळे दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील वाढत्या सीमा संघर्षात मध्यस्थी करण्याची ऑफर दिली. तसेच त्यांनी आपण युद्धे सोडवण्यात आणि शांतता प्रस्थापित करण्यात तज्ज्ञ असल्याचा दावा केला आहे.
पाकिस्ताना आणि अफगाणिस्तान यांच्यात दोन दिवस चाललेल्या संघर्षामुळे दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले आहे. तालिबानने ५८ पाकिस्तानी सैनिकांना मारल्याचा दावा केला आहे. तर, पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या अनेक चौक्या ताब्यात घेतल्याचे सांगितले आहे. दोन्ही देशांतील तणावादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध सोडवण्याच्या आपल्या कथित क्षमतेवर भर दिला. ते म्हणाले की, "मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ आहे, मी शांतता प्रस्थापित करण्यात तज्ज्ञ आहे, असे करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे."
आंतरराष्ट्रीय बाबींमध्ये मध्यस्थी करण्याची ऑफर देऊन, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक व्यासपीठावर सक्रिय भूमिका बजावण्याचा आपला इरादा स्पष्ट केला आहे. ट्रम्प यांनी यापूर्वीही अनेक आंतरराष्ट्रीय संघर्षांमध्ये मध्यस्थी करून ते थांबवले असल्याचे दावे केले आहेत. अलिकडेच त्यांनी गाझामधील युद्धबंदी हे त्यांनी सोडवलेले 'आठवे युद्ध' असल्याचे वर्णन केले होते. त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदी सोडवल्याचाही दावा केला होता, जो भारताने सातत्याने नाकारला आहे. ट्रम्प यांनी अनेकदा त्यांच्या व्यापारी दबावाचा आणि जकातींच्या धमकींचा वापर करून अनेक युद्धे लवकर संपवल्याचा दावा केला आहे.