ट्रम्प आजपर्यंतचे सर्वोत्तम कुशाग्र, मुत्सद्दी लष्करप्रमुख; संरक्षणमंत्री हेगसेथचा डेमोक्रॅटिक पक्षावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 08:55 IST2026-05-01T08:55:09+5:302026-05-01T08:55:44+5:30
सुनावणीत अमेरिकेचे संरक्षणमंत्री हेगसेथचा डेमोक्रॅटिक पक्षावर हल्ला, इराणशी अण्वस्त्र कराराच्या शक्यतेवर चर्चा करण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ट्रम्प यांच्यापुढे बुधवारी प्रस्ताव ठेवला.

ट्रम्प आजपर्यंतचे सर्वोत्तम कुशाग्र, मुत्सद्दी लष्करप्रमुख; संरक्षणमंत्री हेगसेथचा डेमोक्रॅटिक पक्षावर हल्ला
वॉशिंग्टन : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ आणि डेमोक्रॅट खासदार यांच्यात बुधवारी प्रतिनिधी सभेत अभूतपूर्व संघर्ष पाहायला मिळाला. सुमारे सहा तास चाललेल्या या सुनावणीत ट्रम्प प्रशासनाच्या १,५०० अब्ज डॉलरच्या संरक्षण बजेटवर चर्चा झाली. यात हेगसेथ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वोत्तम लष्करप्रमुख असून ते सर्वात तल्लख व मुत्सद्दी असल्याचा दावा केला. सुनावणीत डेमोक्रॅट सदस्यांनी ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष पदासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम आहेत का, असा प्रश्न केला. यावर हेगसेथ यांनी ट्रम्प हे आजपर्यंतचे सर्वात कुशाग्र, तल्लख आणि मुत्सद्दी असे देशाचे लष्करप्रमुख आहेत, असा दावा केला. डेमोक्रॅट सदस्य ट्रम्प यांचा द्वेष करतात असाही आरोप हेगसेथनी केला.
जर्मनीतून सैन्य मागे घेण्याचा अमेरिकेचा इशारा
इराणविरुद्धच्या युद्धात जर्मनीने साथ न दिल्याने आधीच दुखावलेल्या ट्रम्प यांनी जर्मनीचे चान्सलर फ्रीड्रिक मर्झ यांच्या अमेरिकेच्या युद्ध रणनीतीवर टीका केल्याने संताप व्यक्त केला आहे. त्यांनी जर्मनीतील अमेरिकेची लष्करी उपस्थिती कमी करण्याची धमकी देत जर्मनीतील सैन्य कपातीचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल असे म्हटले आहे.
पुतिनची ट्रम्पना ‘ऑफर’
इराणशी अण्वस्त्र कराराच्या शक्यतेवर चर्चा करण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ट्रम्प यांच्यापुढे बुधवारी प्रस्ताव ठेवला. इराणकडे असलेले सुमारे ९७० पाउंड संपृक्त युरेनियम ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी रशिया मध्यस्थ म्हणून काम करेल असा प्रस्ताव पुतीन यांनी दिला आहे. यावर पुतीन यांची इराणकडून युरेनियम मिळवण्यात मदत होत असेल, तर त्यांना ती मदत आवडेल. मात्र, युरेनियमपेक्षा तुम्ही युक्रेन युद्ध संपवण्यात सहभागी झालात, तर ते माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे असेल, असे आपण त्यांना म्हटल्याचे ट्रम्पनी सांगितले.