ब्राझीलमधील बेलो होरिझोंटे या प्रमुख शहरात अमेरिकेतील ९/११ हल्ल्यांची आठवण करून देणारा एक भीषण अपघात घडला आहे. एक छोटे विमान अचानक एका निवासी इमारतीवर कोसळले आणि काही क्षणांतच मोठी दुर्घटना घडली. धूर, आग आणि किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरून गेला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आणि इतर अनेक जण जखमी झालेत. जर विमानाने थोडी वेगळी दिशा घेतली असती तर नुकसान आणखी मोठे झाले असते.
ब्राझीलमध्ये काय झालं?
सोमवारी ब्राझीलच्या बेलो होरिझोंटे शहरात एक विमान रहिवासी इमारतीला धडकले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पायलट आणि को-पायलटचा समावेश आहे. या विमानातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले अशी माहिती मिनास जेराइल राज्याच्या अग्निशमन दलाने दिली. अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, या विमानाने थेट इमारतीला धडक दिली. परंतु आतील कोणीही जखमी झाले नाही आणि इमारत कोसळण्याचा कोणताही 'स्पष्ट धोका' नव्हता. टीव्ही ग्लोबो चॅनलच्या एका हेलिकॉप्टरने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यात विमान हळूहळू खाली येताना दिसत होते. त्यानंतर उंच इमारती टाळण्यासाठी डावीकडे वळताना या विमानाने ३ मजली इमारतीला धडक दिली. त्यानंतर हे विमान पार्किंग लॉटमध्ये कोसळले.
या विमानाने इमारतीच्या पायऱ्यांवरील भागाला टक्कर दिली. ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली. जर विमान इमारतीच्या आणखी बाजूला धडकले असते तर ते एखाद्या फ्लॅटमध्ये जाऊ शकले असते, जिथे लोक उपस्थित होते पण सुदैवाने ते घडले नाही. बचाव पथकाने इमारतीतील सर्व लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात मदत केली. एका माहितीनुसार, ब्राझीलमध्ये २०२५ साली एकूण १५३ विमान अपघात झाले आहेत. ज्यात ६२ लोकांना जीव गमवावा लागला आहे.
अमेरिकेत ५ जणांचा मृत्यू
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एक विमान अपघात झाला होता. या विमानातील सर्व ५ जण अपघातात मृत झाले. गुरुवारी रात्री ऑस्टिनच्या दक्षिण पश्चिम भागापासून काही अंतरावरील विम्बरली शहरात ही घटना घडली. ४२१ सी विमान रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला अशी माहिती फेडरेशन एविएशन एडमिनिस्ट्रेशन यांनी दिली होती.