“युद्धाचा निकाल स्पष्ट, इराण शरण येईल”; G7 देशांच्या बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 18:41 IST2026-03-13T18:38:30+5:302026-03-13T18:41:06+5:30
America Israel Iran War News: डोनाल्ड ट्रम्प कितीही दावे करत असले तरी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या अहवालातून वेगळीच माहिती समोर येत आहे.

“युद्धाचा निकाल स्पष्ट, इराण शरण येईल”; G7 देशांच्या बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
America Israel Iran War News: अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध कधी संपेल, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. या युद्धाची व्यापकता वाढत चालली आहे. या युद्धाची धग अनेक देशांना जाणवत आहे. यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एक मोठा दावा केला आहे. जी ७ देशांच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध सुरू असलेल्या 'ऑपरेशन एपिक फ्युरी' या लष्करी मोहिमेचाही उल्लेख केला. जगासाठी धोका ठरणारा कॅन्सरसारखा घटक आपण संपवला आहे. सध्या इराणमध्ये स्पष्ट नेतृत्व दिसत नाही, त्यामुळे अधिकृतपणे शरणागती जाहीर करणारा नेता तिथे नाही. इराणची स्थिती आता कमकुवत झाली आहे. त्यामुळे इराण आता शरणागतीच्या उंबरठ्यावर पोहोचल्यासारखा दिसत आहे. नेता कोण आहे, हे कोणालाही माहिती नाही, त्यामुळे कोणीही आत्मसमर्पणाची घोषणा करू शकत नाही, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.
अशा नेत्यांचा अंत करणे हा सन्मानाचा विषय
अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध १४ व्या दिवशीही जारी आहे. या युद्धाच्या झळा अनेक देशांना बसत आहेत. कच्च्या तेल्याच्या पुरवठ्याची साखळी तुटल्याचा परिणाम अनेक देशांवर जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणच्या नेतृत्वावर तीव्र टीका केली आहे. तसेच अशा नेत्यांचा अंत करणे हा सन्मानाचा विषय असल्याचे म्हणाले.
दरम्यान, एकीकडे इराण शरण येणार असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प हे करत असले तरी अमेरिकेच्याच गुप्तचर यंत्रणेच्या अहवालातून वेगळीच माहिती समोर येत आहे. अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार, इराणमधील सत्ताधारी नेतृत्व अजूनही स्थिर असून सरकार कोसळ्याची कोणतीही शक्यता नाही. इराणमधील कट्टर नेतृत्व सत्तेत कायम राहिल्यास युद्ध संपवण्याचा मार्ग कठीण असल्याचेही गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे.