तेल निर्यातीसाठी पर्याय; दशकानंतर इराक-सीरिया सीमा मार्ग पुन्हा खुला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 13:09 IST2026-04-22T13:05:45+5:302026-04-22T13:09:36+5:30
इराक आणि सीरियामधील एक अत्यंत महत्त्वाचा सीमा मार्ग तब्बल १० वर्षांनंतर सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आला.

तेल निर्यातीसाठी पर्याय; दशकानंतर इराक-सीरिया सीमा मार्ग पुन्हा खुला
इराक आणि सीरियामधील एक अत्यंत महत्त्वाचा सीमा मार्ग तब्बल १० वर्षांनंतर सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आला. या निर्णयामुळे क्षेत्रिय व्यापार आणि विशेषत: तेल निर्यातीला मोठी गती मिळण्याची अपेक्षा दोन्ही देश व्यक्त करीत आहेत. इराण युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक अनिश्चित बनली असताना, सीरियाने या मार्गाला तेल निर्यातीसाठी एक सुरक्षित ‘जमिनीवरील पर्याय’ म्हणून सादर केले आहे.
अमेरिका, इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे समुद्रमार्गे होणारी तेलाची वाहतूक कधीही थांबू शकते. अशा वेळी इराक आणि सीरियाने आपले जुने मार्ग पुन्हा सुरू करणे, हा जागतिक तेल बाजार स्थिर ठेवण्यासाठी उचललेले एक धोरणात्मक पाऊल मानले जात आहे. यामुळे इराकचे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर असलेले अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. एप्रिल ते जून या काळात दरमहा सुमारे ६.५ लाख मेट्रिक टन इंधन तेलाचे कंत्राट एसओएमओ कंपनीला मिळाले आहे. हे तेल सीरियामार्गे टँकरद्वारे या रस्त्याने नेण्याची शक्यता आहे.
या सीमा मार्गाचा इतिहास
- या मार्गाला इराकमध्ये ‘राबिया’ आणि सीरियामध्ये ‘यारुबियाह’ या नावाने ओळखले जाते.
- २०११ मध्ये सीरियात असाद सरकारविरोधात यादवी युद्ध सुरू झाल्याने हा मार्ग बंद केला होता आला.
- २०१४ मध्ये या भागावर ‘इस्लामिक स्टेट’च्या दहशतवाद्यांनी कब्जा केला होता. त्यानंतर इराकी कुर्द फौजांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला होता.
इराकसाठी ‘लाइफ लाइन’
इराकची अर्थव्यवस्था ९० टक्क्यांहून अधिक तेल उत्पन्नावर अवलंबून आहे. आतापर्यंत इराकची तेलनिर्यात होर्मुझच्या मार्गातून होत असे. मात्र, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हा मार्ग धोक्यात आला आहे. सीरियामार्गे जाणारा हा जमिनीवरील मार्ग आता इराकसाठी ‘लाइफलाइन’ ठरू शकतो. आखातातील युद्धामुळे इराककडे इंधनाचा प्रचंड साठा साचला असून, हा साठा रिकामा करण्यासाठी सध्या इराकची मोठी ओढाताण होत आहे.
इराणी जहाजाशी संबंध नाही; चीनचे स्पष्टीकरण
आखाती प्रदेशात अमेरिकेने जप्त केलेल्या आणि क्षेपणास्त्र बनविण्यासाठी लागणारे रासायनिक पदार्थ वाहून नेणाऱ्या इराणी मालवाहू जहाजाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे चीनने मंगळवारी स्पष्ट केले. अमेरिकेच्या माजी संयुक्त राष्ट्रातील दूत निक्की हेली यांनी केलेल्या आरोपांनंतर चीनने ही आक्रमक भूमिका घेतली आहे. हे जहाज दुसऱ्या देशाचे असून, चीनला यात विनाकारण ओढण्याचे व अफवा पसरवू नका, असे चीनने म्हटले आहे.
शरीफ, मुनीरना ‘नोबेल’ द्या
आखातीतल तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानच्या मुत्सद्दी प्रयत्नांची दखल घेत, पंतप्रधान शहबाज शरीफ व लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांना शांततेचे नोबेल पारितोषिक द्यावे, अशी मागणी करणारा प्रस्ताव खैबर पख्तूनख्वा विधानसभेत पीएमएल-एनच्या आमदार फराह खान यांनी मंगळवारी मांडला.