मोठी बातमी! अफगाणिस्तानचे ड्रोन इस्लामाबादपर्यंत पोहोचले; भारतीय सीमेजवळचे नौशेरा, अबोटाबाद मिलिटरी कॅम्पवर एअर स्ट्राईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 14:52 IST2026-02-27T14:50:12+5:302026-02-27T14:52:05+5:30
Afghan Air Force strike on Pakistan: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले आहे. अफगाण हवाई दलाने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह नौशेरा आणि एबटाबादमधील लष्करी तळांवर भीषण हवाई हल्ले केले आहेत. वाचा सविस्तर वृत्त.

मोठी बातमी! अफगाणिस्तानचे ड्रोन इस्लामाबादपर्यंत पोहोचले; भारतीय सीमेजवळचे नौशेरा, अबोटाबाद मिलिटरी कॅम्पवर एअर स्ट्राईक
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमावादाने आता युद्धाचे भीषण रूप धारण केले असून, शुक्रवारी अफगाणिस्तानने थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर हवाई हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अफगाण हवाई दलाने शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास ही मोठी कारवाई केली. यामुळे दक्षिण आशियातील भू-राजकीय तणाव कमालीचा वाढला आहे.
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे लक्ष्य पाकिस्तानचे लष्करी तळ होते. इस्लामाबादमधील फैजाबाद शहरा जवळील एका मिलिटरी कॅम्पवर अफगाण विमानांनी बॉम्बफेक केली. यानंतर नौशेरा आणि अबोटाबाद येथील लष्करी बॅरेक्स आणि तळांना लक्ष्य करण्यात आले.
जमरूद मिलिटरी कॉलनीवरही हल्ले करण्यात आले. हा हल्ला पाकिस्तानने काल काबूल आणि कंदहारमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांचा 'बदला' असल्याचे अफगाणिस्तानने म्हटले आहे. ही सर्व ठिकाणे भारतीय सीमेवरून अत्यंत जवळ आहेत. अफगाणिस्तानच्या हवाई दलाने ड्रोनद्वारे हे हल्ले केल्याचे सांगितले जात आहे.
५५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू, १९ चौक्यांवर तालिबानचा ताबा
हवाई हल्ल्यांव्यतिरिक्त जमिनीवरील युद्धातही पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे. ड्युरंड लाईनवर झालेल्या चकमकीत ५५ पाकिस्तानी सैनिक मारले गेले असून, तालिबानने पाकिस्तानच्या दोन लष्करी मुख्यालयांसह १९ चौक्यांवर कब्जा मिळवला आहे. अफगाण सैन्याने मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी शस्त्रे जप्त केली असून काही सैनिकांना जिवंत पकडल्याचा दावाही 'टोलो न्यूज'ने केला आहे.
सीमेवर अघोषित युद्ध
तालिबान कमांडर्सनी जारी केलेल्या व्हिडिओंमध्ये ते पाकिस्तानी सैनिकांकडून जप्त केलेली शस्त्रे वाटताना दिसत आहेत. या चकमकीत ८ अफगाण सैनिकही ठार झाले असून ११ जखमी झाले आहेत. तोर्खम सीमेवर पाकिस्तानच्या हल्ल्यात १३ नागरिक जखमी झाल्याने अफगाणिस्तानचा संताप अनावर झाला होता, ज्याचे रूपांतर आता पूर्ण युद्धाच्या घोषणेत झाले आहे.