वसमत (हिंगोली): तालुक्यातील चोंडी फाट्यावर गुरुवारच्या रात्री दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार पोलिस शिपाई गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शुक्रवारी कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
वसमत ते औढा नागनाथ मार्गावरील चोंडीफाटा येथे औंढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस शिपाई विनायक सुदामराव सुपेकर (वय ३३, रा. खांडेगाव) यांच्या दुचाकीचा १९ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले व यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिस शिपाई सुपेकर हे कर्तव्य बजावून वसमत येथे येत होते. रस्त्यातच त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या घटनेने सुपेकर कुटुंबावर दुःख कोसळले आहे. पोलिस विभागात त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
दवाखान्यात नेण्यापूर्वीच मृत्यू...१९ डिसेंबर रोजी रात्री अपघात झाला. कुरुंदा पोलिस पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना रस्त्याच्या कडेला दुचाकी दिसून आली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता विनायक सुपेकर दिसून आले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.