हिंगोली : शेतकऱ्यांचे ‘पिवळे सोने’ म्हणून ओळखली जाणारी हळद सध्या पडत्या भावामुळे काळवंडली आहे. गतवर्षी हळदीला सरासरी १५ ते १६ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. मात्र यंदा बाजारात १२ ते १३ हजार ५०० रुपयांपर्यंतच भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. उत्पादन खर्च, मजुरी आणि वाहतूक खर्च वाढलेला असताना मिळणारा कमी दर परवडणारा नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
हळद खरेदी- विक्रीसाठी मराठवाड्यासह विदर्भात प्रसिद्ध असलेल्या येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात गत पंधरा दिवसांपासून हळदीची विक्रमी आवक होत आहे. हिंगोली, परभणी, नांदेडसह विदर्भातील वाशिम, यवतमाळ, वर्धा आदी जिल्ह्यातील शेतकरी हळद घेऊन हिंगोलीचे मार्केट यार्ड गाठत आहेत. परिणामी, आवक वाढत चालली असून, मोजमापासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मार्केट यार्डात मुक्कामी राहण्याची वेळ येत आहे.
त्यातच गतवर्षीच्या तुलनेत यंदा भावही समाधानकारक मिळत नसल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. १५ ते १६ हजार रूपये क्विंटलचा भाव अपेक्षीत असताना केवळ १२ ते १३ हजार किंवा एखाद्या- दुसऱ्या शेतकऱ्यांच्या हळदीला १४ हजार रूपयांपर्यंत भाव मिळत आहे. लागवडखर्चाचा विचार केल्यास सध्याचा भाव परवडणारा नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, १८ मे रोजीच्या बीटसाठी रविवारपासूनच मोठ्या प्रमाणात शेतकरी हळद घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाले होते. मार्केट यार्ड आवार हळदीच्या वाहनांनी भरले असून, बाहेरही वाहनांची रांग लागल्याचे सोमवारी पहायला मिळाले. हळद विक्रीसाठी घेऊन आलेली सुमारे ३०० हून अधिक वाहने रांगेत उभी आहेत.
आर्थिक कोंडी अन् ‘वेट ॲण्ड वॉच’...
गेल्या महिना- दीड महिन्यापासून शेतकऱ्यांच्या हातात नवीन हळद आली आहे. मात्र, बाजारात समाधानकारक आणि अपेक्षित भाव मिळत नसल्याने काहीं शेतकऱ्यांनी ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. भाव वाढतील या आशेने अनेक जण माल घरातच राखून ठेवत आहेत. दुसरीकडे, ज्या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड, आर्थिक अडचणी किंवा पुढील हंगामासाठी पैशांची तातडीची गरज आहे, अशा गरजू शेतकऱ्यांना नाईलाजास्तव आपली हळद पडत्या भावात विकावी लागत आहे. या पडत्या भावाचा थेट फटका शेतकऱ्यांच्या खिशाला बसत आहे.
बाजार समितीत १२ हजार क्विंटलची आवक...
भाव कमी असले तरी बाजारपेठेतील हळदीची आवक मात्र प्रचंड वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारपर्यंत बाजार आवारात जवळपास १२ हजार क्विंटल हळदीची विक्रमी आवक झाली होती. मार्केट यार्ड आवारात सर्वत्र वाहनांची गर्दी झाली असून, बाजार समिती कर्मचाऱ्यांनाही खबरदारी घ्यावी लागत आहे.
शेतकऱ्यांवर मुक्कामाची वेळ!...
मार्केट यार्डात दररोज सुमारे अडीच हजार क्विंटल हळदीचे मोजमाप होते. परंतु, आवक १० ते १२ हजार क्विंटलची होत असल्याने एका दिवसांत बीट आणि मोजमाप करणे शक्य होत नाही. परिणामी, शेकडो शेतकऱ्यांना चार ते पाच दिवस मुक्कामी रहावे लागत आहे.
Web Summary : Falling turmeric prices distress Hingoli farmers despite record market arrivals. Low rates, high costs squeeze profits, forcing sales amidst financial strain. Farmers await better prices.
Web Summary : हिंगोली में हल्दी की कीमतों में गिरावट से किसान परेशान हैं, जबकि बाजार में रिकॉर्ड आवक हो रही है। कम दरें, उच्च लागत लाभ को कम कर रही हैं, जिससे वित्तीय तनाव के बीच बिक्री हो रही है। किसान बेहतर कीमतों का इंतजार कर रहे हैं।