जगातील महासत्ता आपापल्या राजकारणात आणि युद्धांमध्ये व्यस्त असताना, भारताचा शेजारी देश असलेल्या अफगाणिस्तानमधून मन हेलावून टाकणारे वास्तव समोर आले आहे. अफगाणिस्तानमध्ये गरिबी आणि उपासमारीचे संकट इतक्या टोकाला पोहोचले आहे की, तेथील निष्पाप नागरिकांना आणि पालकांना केवळ जिवंत राहण्यासाठी आणि अन्न मिळवण्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्यांना विकण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, अफगाणिस्तानमधील सुमारे ४७ लाख लोक सध्या तीव्र उपासमारीच्या आणि भुकबळीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. ही संख्या अफगाणिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या १० टक्क्यांहून अधिक आहे.
सध्या अफगाणिस्तानच्या घोर प्रांतात परिस्थिती अत्यंत बिकट आहे. रोजगाराच्या शोधात शेकडो मजूर दररोज सकाळी रस्त्याच्या कडेला उभे राहतात, परंतु अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्यामुळे बहुतांश लोकांना रिकाम्या हाताने आणि उपाशी पोटी घरी परतावे लागत आहे.
तीन रात्री मुले झोपली उपाशी; शिळ्या भाकरीसाठी लोकांच्या उड्या!
बीबीसीच्या एका विशेष अहवालानुसार, ४५ वर्षीय मजूर जुमा खान यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, "गेल्या दीड महिन्यात मला फक्त ३ दिवस काम मिळाले. माझी मुले सलग तीन रात्री उपाशी पोटी झोपली आहेत. शेवटी शेजाऱ्यांकडे हात पसरून कसेबसे थोडे पीठ आणले आणि मुलांचे पोट भरले."
दुसरीकडे, रबानी नावाच्या मजुराने सांगितले की, जेव्हा त्याला समजले की त्याची मुले दोन दिवसांपासून भुकेली आहेत, तेव्हा त्याला जगण्याचाच वीट आला. वाढत्या वयामुळे काम न मिळणारे वृद्ध ख्वाजा अहमद तर रडत आपली परिस्थिती सांगत होते. परिस्थिती इतकी भयानक आहे की, स्थानिक बेकरीमध्ये जेव्हा गरीबांसाठी शिळी भाकरी वाटली जाते, तेव्हा ती मिळवण्यासाठी शेकडो लोक एकमेकांवर तुटून पडतात.
उपचारांसाठी ५ वर्षांच्या लेकीचा २ लाखांत सौदा!
ग्रामीण भागातील कहाण्या तर मन हेलावून टाकणाऱ्या आहेत. अब्दुल राशीद अजीमी नावाच्या हताश बापाने सांगितले की, तो आपल्या ७ वर्षांच्या जुळ्या मुलींना विकायला तयार झाले होते, कारण त्यांना खायला घालण्यासाठी त्याच्याकडे काहीच नाही. अशीच एक वेदनादायक कथा सईद अहमद या पित्याची आहे. त्यांच्या ५ वर्षांच्या मुलीला अपेंडिक्स आणि लिव्हरचा गंभीर आजार झाला होता. उपचारासाठी पैसे नसल्यामुळे त्यांनी आपल्याच एका नातेवाईकाला ५ वर्षांच्या शायकाला २ लाख अफगानी चलनामध्ये विकण्याचा करार केला. सध्या उपचारासाठी काही पैसे घेण्यात आले असून, ५ वर्षांनंतर या चिमुरडीला कायमचे नातेवाईकांच्या हवाली करावे लागणार आहे.
अफगाणिस्तानमध्ये अचानक एवढे संकट का वाढले?
अफगाणिस्तान या दलदलीत रुतण्यामागे आंतरराष्ट्रीय राजकारण कारणीभूत आहे. पूर्वी अफगाणिस्तानला जगभरातून मोठी आर्थिक आणि अन्नधान्याची मदत मिळायची. मात्र, अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांनी आता ही मदत जवळपास बंद केली आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, चालू वर्ष २०२६ मधील आंतरराष्ट्रीय मदत ही वर्ष २०२५च्या तुलनेत तब्बल ७० टक्क्यांनी घटली आहे. त्यातच लागोपाठ पडणारा दुष्काळ, वाढती बेरोजगारी आणि गगनचुंबी महागाई यामुळे देशाची वाट लागली आहे.
हॉस्पिटल बनले मृत्यूचे सापळे
या भीषण गरिबीचा सर्वात मोठा फटका नवजात बालकांना आणि लहान मुलांना बसत आहे. अफगाणिस्तानमधील रुग्णालये कुपोषित बालकांनी भरून गेली आहेत. अनेक नवजात बालकांना श्वसनाचा त्रास होत आहे. रुग्णालयांमध्ये पुरेशी औषधे नाहीत आणि पालकांकडे उपचाराचा खर्च उचलण्यासाठी दमडीही उरलेली नाही. त्यामुळे अनेक जण आपल्या आजारी मुलांना तशाच अवस्थेत घरी घेऊन जात आहेत. डॉक्टर आणि नर्सच्या मते, रुग्णालयांमध्ये दररोज अनेक बालके प्राण सोडत असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.
Web Summary : Afghanistan faces a severe hunger crisis, with 4.7 million people starving. Desperate families are selling their children to survive amid drought, unemployment, and reduced international aid, leaving hospitals overwhelmed with malnourished children and rising fatalities.
Web Summary : अफगानिस्तान में गंभीर भुखमरी का संकट है, 47 लाख लोग भूखे हैं। सूखे, बेरोजगारी और कम अंतरराष्ट्रीय सहायता के बीच बेहाल परिवार जीवित रहने के लिए अपने बच्चों को बेच रहे हैं, कुपोषित बच्चों और बढ़ती मौतों से अस्पताल भरे हुए हैं।