वसमतमध्ये डिझेलचा तुटवडा; सलग दुसऱ्या दिवशी पंपांवर वाहनांच्या १ किमी लांब रांगा, शेतकरी संकटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 15:15 IST2026-05-19T15:13:29+5:302026-05-19T15:15:26+5:30
वसमतमध्ये 'कृत्रिम टंचाई' निर्माण करून ग्राहकांची लूट होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

वसमतमध्ये डिझेलचा तुटवडा; सलग दुसऱ्या दिवशी पंपांवर वाहनांच्या १ किमी लांब रांगा, शेतकरी संकटात
वसमत (जि. हिंगोली): वसमत शहरासह ग्रामीण भागात गेल्या आठवडाभरापासून डिझेल आणि पेट्रोलचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. मंगळवारी पहाटेपासूनच शहरातील बसस्थानक परिसरातील मुख्य पेट्रोल पंपावर डिझेलसाठी तब्बल एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले.
पंपांना 'कॅनींचा' वेढा; वशिल्याने डिझेल वाटप?
केवळ वाहनेच नव्हे, तर शेतीच्या कामांसाठी डिझेल खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी पंपावर प्लास्टिकच्या कॅन (कॅऱ्या) घेऊन प्रचंड गर्दी केली होती. संपूर्ण पंप परिसराला कॅनींचा वेढा पडला होता. सर्वसामान्य नागरिकांना डिझेल मिळवण्यासाठी भरउन्हात तासनतास ताटकळत राहावे लागत असताना, दुसरीकडे काही पंपचालक आपल्या जवळच्या नातेवाईकांना आणि ओळखीच्या लोकांना मात्र मागच्या दाराने कॅनद्वारे भरपूर डिझेल पुरवत असल्याचा धक्कादायक पक्षपातीपणा समोर येत आहे.
जादा दराने विक्री; 'कृत्रिम टंचाई'चा संशय...
वसमत शहरात ५ आणि ग्रामीण भागात १० असे एकूण १५ पेट्रोल पंप आहेत. या सर्वच भागात गेल्या आठवड्यापासून इंधनाची टंचाई जाणवत आहे. मात्र, ही टंचाई खरोखरच कंपन्यांकडून आहे की जास्तीचे पैसे कमावण्यासाठी जाणूनबुजून 'कृत्रिम टंचाई' निर्माण केली जात आहे, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. हतबल वाहनधारकांकडून डिझेलसाठी छुप्या पद्धतीने जादा पैसे उकळले जात असल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला आहे.
तहसील प्रशासनाचा धाक संपुष्टात?
यापूर्वी शहरातील पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा आणि गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर, तहसील पुरवठा विभागाने पंपांना भेटी देऊन पाहणी केली होती. प्रशासनाने कारवाईचा इशारा दिला होता, मात्र त्यानंतरही पंपधारकांच्या मनमानी कारभारात कोणतीही सुधारणा झालेली नाही. प्रशासनाची ती पाहणी केवळ 'दिखावा' ठरली का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. सध्या शेतीचा हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व इतर यंत्रांसाठी डिझेलची मोठी आवश्यकता आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यात तात्काळ लक्ष घालण्याची मागणी होत आहे.