अलिकडे लोकांना डायबिटीस होण्याचं प्रमाण वाढलं असून लाइफस्टाईलमधे आणि खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल यामुळे कमी वयात लोक डायबिटीसचे शिकार होत आहेत. यातील धक्कादायक बाब म्हणजे अनेकांना हे कळतंच नाही की, त्यांना डायबिटीस आहे. अशात या आजाराची काही सुरूवातीची लक्षणे वेळीच ओळखली तर हा आजार वाढण्यापासून रोखण्यास मदत मिळेल.
रात्री पुन्हा-पुन्हा लघवी लागणे
रात्री झोपण्यापूर्वी वॉशरूमला जाणं सामान्य बाब आहे. पण जर हे प्रमाण खूप जास्त असेल तर तुम्ही डायबिटीसची टेस्ट करून घ्यावी. या आजाराने प्रोस्टेट टिशूवरही प्रभाव पडतो, त्यामुळे व्यक्तीला पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागतं.
स्किनवर काळे डाग
तुम्ही तुमच्या स्किनची खूप काळजी घेत असाल आणि तरी सुद्धा मानेवर, हाताच्या कोपरांवर आणि गुडघ्यांवर काळे किंवा निळे डाग दिसत असतील तर वेळीच शुगरची टेस्ट करावी. इन्सुलिनमध्ये गडबड झाल्यावर हे डाग येतात. जर डायबिटीसची माहिती वेळेत मिळाली आणि यावर उपचार घेतले तर हे डागही जातात.
वाचण्यात अडचण
डायबिटीसचा प्रभाव डोळ्यांवरही पडतो. त्यामुळे व्यक्तीची नजर कमजोर होऊ लागते. जर तुम्हाला वाचताना काही अडचण येत असेल तर डोळ्यांची तपासणी करण्यासोबतच एकदा ब्लड शुगर लेव्हलची चेक करा.
अचानक वजन कमी होणे
जर तुमचं अचानक वजन कमी होऊ लागलं असेल तर आनंदी होऊ नका. हा डायबिटीसचा संकेत असू शकतो. डॉक्टरांनुसार, जर तुम्ही हेल्दी डाएट घेत असाल किंवा जास्त खात असाल तरी सुद्धा वजन कमी होत असेल तर डायबिटीसची टेस्ट करावी.
बीपीमध्ये गडबड
जर तुमच्या अनेक प्रयत्नानंतरही ब्लड प्रेशर वाढत जात असेल वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डायबिटीससोबत जर बीपी वाढत गेला तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
काय घ्याल काळजी
ही लक्षणे डायबिटीसकडे इशारा करतात, पण या आजाराबाबत स्पष्टता ब्लड टेस्टच्या माध्यमातूनच येऊ शकते. टेस्ट रिपोर्ट्वरून स्वत:च अंदाज लावत बसण्यापेक्षा डॉक्टरांना दाखवा आणि त्यांना तुमच्या लक्षणांबाबत सांगा. जेणेकरून डायबिटीस नसेल तर शरीराला होत असलेल्या इतर समस्या जाणून घेऊन त्यावर उपचार घेता येतील.