नेल पॉलिश की 'स्लो पॉयझन'? नखं सजवण्याच्या नादात आरोग्याशी खेळू नका; पाहा धक्कादायक वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 11:32 IST2026-05-09T11:30:39+5:302026-05-09T11:32:57+5:30
नखे मृत पेशींनी बनलेली असल्याने त्यावर काहीही लावल्यास शरीरावर परिणाम होत नाही, असा समज चुकीचा आहे. नखे छिद्रयुक्त असतात.

नेल पॉलिश की 'स्लो पॉयझन'? नखं सजवण्याच्या नादात आरोग्याशी खेळू नका; पाहा धक्कादायक वास्तव
नवी दिल्ली : नखांना रंगवणे हे व्यक्तिमत्त्व खुलवण्याचे माध्यम बनले आहे. मात्र, नेल पेंटमधील चमकदार रंग आणि आकर्षक ‘जेल फिनिश’च्या मागे अशा रसायनांचे जाळे दडलेले असते, ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असे ‘नॅशनल लायब्ररी ऑफ हेल्थ’मध्ये एका संशोधनपर लेखात म्हटले आहे.
नखे मृत पेशींनी बनलेली असल्याने त्यावर काहीही लावल्यास शरीरावर परिणाम होत नाही, असा समज चुकीचा आहे. नखे छिद्रयुक्त असतात. नेल पॉलिशमधील रसायने नखांतून रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचू शकतात. नेल पॉलिशच्या बाटलीत अनेक गुंतागुंतीची रासायनिक संयुगे असतात. ती मुख्यतः चार प्रकारांत विभागली जातात.
फिल्म फॉर्मर्स : नायट्रोसेल्युलोज जे नखांवर मजबूत थर तयार करते.
रेझिन आणि प्लास्टिसायझर्स : पॉलिश लवचिक राहते.
सॉल्व्हेंट्स : इतर घटक विरघळवून ठेवतात आणि हवेत उडून गेल्यावर पॉलिश सुकते.
पिगमेंट्स : वेगवेगळे आकर्षक रंग देतात.
खरा धोका नेलपेंटमधील या टॉक्सिक ट्रायोंचा
डिब्युटिल फ्थॅलेट : हे प्लास्टिसायझर नेल पेंट उखडू नये म्हणून वापरतात. हे प्रजननविषयक अवयवांवर परिणाम आणि हार्मोनल असंतुलन निर्माण करू शकते. अनेक देशांमध्ये याच्या वापरावर निर्बंध आहेत.
टोल्युईन : हे सॉल्व्हेंट नेल पॉलिशला स्मूथ टेक्चर देते. त्याचा तीव्र वास डोकेदुखी, चक्कर, डोळ्यांत जळजळ निर्माण करू शकतो. दीर्घकाळ संपर्क राहिल्यास मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
फॉर्मल्डिहाइड : नखे कठीण करण्यासाठी वापरले जाते. हे कॅन्सरकारक रसायन आहे. याने त्वचेला ॲलर्जी, श्वासास त्रास होऊ शकतो.
आरोग्यावर परिणाम...
श्वसन समस्या : सतत रसायनांच्या संपर्कात असल्याने नेल टेक्निशियनांत अस्थमा व फुप्फुसांचे आजार दिसतात.
हार्मोनल बिघाड : फ्थॅलेट्स शरीरातील नैसर्गिक हार्मोन्समध्ये हस्तक्षेप करू शकतात.
नखे कमकुवत होणे : जास्त वापरामुळे नखे पिवळी, ठिसूळ, कमकुवत होतात.
ही काळजी घ्या...
अशा उत्पादनाचे लेबल, सूचना वाचा.
घरात नेल पॉलिश लावताना हवा खेळती ठेवा.
बेस कोट वापरा. त्याने संरक्षण होते.
सतत नेल पेंट लावून ठेवू नका; नखांना नैसर्गिक ठेवण्याचा प्रयत्न करा.
मुलांसाठी वॉटर-बेस्ड पेंट वापरा.