LMOTY 2026: डॉ. आरती किणीकर ठरल्या वैद्यकीय क्षेत्रातील 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 20:35 IST2026-03-10T20:34:01+5:302026-03-10T20:35:16+5:30
Lokmat Maharashtrian of the Year awards 2026: जेनेटिक्स क्षेत्रात जगात प्रथमच निओनॅटल ट्रांसीएट डायबेटीस मेलिटस संदर्भात नवीन जेनेटिक म्युटेशन व्हेरिएन्ट शोधून काढण्याचे कार्य डॉ. किणीकर यांनी केले.

LMOTY 2026: डॉ. आरती किणीकर ठरल्या वैद्यकीय क्षेत्रातील 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'!
Lokmat Maharashtrian of the Year awards 2026: महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि चर्चेत असणारा बहुप्रतिक्षित लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२६ हा सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ अभिनेते आमिर खान, विकी कौशल यांसह राज्यभरातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यावेळी वैद्यकीय शासकीय - महाराष्ट्र या विभागातून डॉ. आरती किणीकर यांना भरीव योगदानासाठी व कामगिरीसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. आरती किणीकर या बालरोगचिकित्साशास्त्र विभागात उपअधिष्ठाता व प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत. बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथेल त्या कार्यरत आहेत. मागील ४० वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत अध्यापन व संशोधन त्या करत आहेत. २०१७ साली ससून रुग्णालयात त्यांनी ५९ खाटांचे अत्याधुनिक लेव्हल ३ नवजात अतिदक्षता विभाग स्थापन केले. या विभागामार्फत दरवर्षी ३००० ते ४००० अतिगंभीर नवजात बालकांना जीवनदान दिले जाते.
डॉ. आरती किणीकर यांनी डीएम निओनॅटोलॉजी सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू करण्यात पुढाकार घेतला. २०१७ पासून नवजात शिशू काळजीसाठी राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र सुरू करून हजारो नर्सेसना त्यांनी प्रशिक्षित केले. बीएलएस व पीएएलएस राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र स्थापन करून ४०००–५००० नागरिकांना सीपीआर प्रशिक्षण दिले. “इंडिजिनियेस बबल सीपॅप ” व्हेंटिलेटर सर्किट हे पेटंट संशोधन करून व्हेंटिलेटरच्या कमतरतेच्या काळात त्यांनी हजारो बालकांचे प्राण वाचविले.
लहान मुलांमधील एच आय व्ही, टीबी, कोविड व क्लिनिकल जेनेटिक्स साठी “सेंटर ऑफ एक्सलेन्स”ची त्यांनी स्थापना केली. २०१० पासून गर्भावस्थेत थॅलेसेमिया निदान सुविधा ३०० पेक्षा अधिक मातांना त्याचा लाभ मिळाला. जेनेटिक्स क्षेत्रात जगात प्रथमच निओनॅटल ट्रांसीएट डायबेटीस मेलिटस संदर्भात नवीन जेनेटिक म्युटेशन व्हेरिएन्ट शोधून काढण्याचे कार्य त्यांनी केले. एचआयव्ही व टीबी संदर्भातील संशोधनामुळे डब्ल्यूएचओ मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल तसेच २०१३ पासून मातृदुग्धपेढी स्थापना त्यांनी केली. २०२४ पासून कंजेनायटल हायपोथायरॉडिजम स्क्रीनिंग (सीएसआर अंतर्गत मोफत), ४००० बालकांची तपासणी; ५ बालकांचे लवकर निदान आणि २०० हून अधिक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध असे त्यांचे भरीव योगदान आहे.