लग्नसोहळा आटोपून घरी परतत होते; कारची झाडाला धडक पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 17:20 IST2025-11-24T17:18:24+5:302025-11-24T17:20:41+5:30
Gondia :राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर देवरीजवळील नवाटोला शिवारात रायपूरहून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव अनियंत्रित कारने झाडाला धडक दिली.

Wife dies on the spot, husband critical after car hits tree while returning home after wedding
देवरी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर देवरीजवळील नवाटोला शिवारात रायपूरहून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव अनियंत्रित कारने झाडाला धडक दिली. या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.२४) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. गीता प्रशांतकुमार श्रीवास्तव (वय ५०) असे मृतक पत्नीचे नाव आहे. तर प्रशांतकुमार श्रीवास्तव असे जखमी पतीचे नाव आहे. ते वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलीस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार वर्धा येथील बँक ऑफ इंडिया कॉलनीतील रहिवासी श्रीवास्तव दांपत्य नातेवाईकांचे लग्न समारंभ आटोपून साेमवारी दुपारी कार क्रमांक एमएच ३३ एस १०२० ने दोघेच रायपूरवरून वर्धेला जात होते. दरम्यान देवरी तालुक्यातील नवाटोला शिवारात भरधाव वेगात कार अनियंत्रित होऊन रस्त्याखालील खड्ड्यात झाडावर जाऊन धडकली. यात प्रशांतकुमार श्रीवास्तव यांची पत्नी गीता यांचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालक प्रशांत कुमार हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथील खाजगी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. देवरी पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास पोलिस हवालदार ग्यानीराम करंजेकर हे करीत आहेत.