Thirteen corona positive with police officer | पोलीस अधिकाऱ्यासह तेरा कोरोना पॉझिटिव्ह

पोलीस अधिकाऱ्यासह तेरा कोरोना पॉझिटिव्ह

ठळक मुद्देगुरूवारपासून चार दिवस जनता कर्फ्यू : परिसरात वाढतोय कोरोनाचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : येथील पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांसह तेरा पोलीस शिपाई कोरोना बाधित आढळले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. येथील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी १३ ते १६ ऑगस्ट दरम्यान नवेगावबांध येथे जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे सरपंच अनिरुध्द शहारे यांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत एका होमगार्डला ८ ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. त्याचे संपर्कामुळे येथील पोलीस अधिकाऱ्यासह तेरा पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस अधिकाऱ्यासह आठ पोलीस शिपायांना कोरोनाची लागण झाल्याचे १० ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या प्रयोगशाळेच्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. एक नायब पोलीस हवालदार सुटीवर भंडारा जिल्ह्यातील आपल्या स्वगावी गेला होता. तोही कोरोना बाधित निघाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे येथील पोलीस स्टेशन मधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३ झाली आहे. याच पार्श्वभुमीवर १३ ते १६ ऑगस्टपर्यंत जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे. नागरिकांना किराणा, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी बुधवारपर्यंत वेळ देण्यात आली.
१३ ऑगस्टला सकाळी सात वाजतापासून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. असे ग्रामपंचायतच्यावतीने कळविण्यात आले आहे. ज्या व्यक्ती पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आले असतील, त्यांनी ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे जाऊन तपासणी करावी. तपासणी मोफत केला जाणार आहे. असे सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी कळविले आहे. नागरिकांनी तोंडाला रुमाल, मास्कचा वापर करून स्वत:ची काळजी घ्यावी.

जनता कर्फ्यूचा निर्णय एकमताने
गावात कोरोनाचा संसर्ग वाढू नये आणि संसर्गाची साखळी खंडीत व्हावी यासाठी मंगळवारी (दि.११) ग्रामपंचायमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत स्थानिक व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात व्यापारी आस्थापना विषयी सविस्तर चर्चा करून, चार दिवसाचा जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर शासकीय विश्रामगृह नवेगावबांध येथे अर्जुनी मोरगावच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी याबाबतची बैठक घेऊन, गावात संसर्ग होऊ नये त्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. स्थानिक अधिकारी, पदाधिकारी व व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. बैठकीला देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, तहसीलदार विनोद मेश्राम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय राऊत, गटविकास अधिकारी मयूर अंदेलवाड, सरपंच अनिरुद्ध शहारे, ग्रामविकास अधिकारी परशुराम चव्हाण, तलाठी पुंडलिक कुंभरे उपस्थित होते.

Web Title: Thirteen corona positive with police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.