फुटला अश्रूंचा बांध, पण आता त्या कुटुंबानी केला धैर्याने जगण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 05:00 AM2021-06-11T05:00:00+5:302021-06-11T05:00:27+5:30

प्रशासनाचा कारभार म्हटला की अधिकारी, कर्मचाऱ्यांतील बरबटपणा, मरगळ, लाचेची मागणी, जनतेची ससेहोलपट हेच चित्र  नजरेसमोर उभे राहते; परंतु प्रशासनातही काही लोक कर्तव्यतत्पर असतात हेसुद्धा तेवढंच खरं आहे. याचं ज्वलंत वास्तव कोरोनात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांना मदत करतेवेळी आली. गोंदियाचे प्रभारी जिल्हाधिकारी राजेश खवले व अर्जुनी मोरगावचे तहसीलदार विनोद मेश्राम हे आपल्या सहकाऱ्यांसह मदत व सांत्वना भेट देण्यासाठी झटताना दिसत आहेत.

Tears welled up in his eyes, but now the family is determined to live with courage | फुटला अश्रूंचा बांध, पण आता त्या कुटुंबानी केला धैर्याने जगण्याचा निर्धार

फुटला अश्रूंचा बांध, पण आता त्या कुटुंबानी केला धैर्याने जगण्याचा निर्धार

Next
ठळक मुद्देकोरोनातील मृतकांच्या कुटुंबीयांना प्रशासनाने दिले बळ : दारापर्यंत पोहोचविली जात आहे मदत

 संतोष बुकावन 
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : कुणी तरुण तर कुणी चिल्यापिल्यांना सोडून गेले. ज्या नेमक्या उमेदीच्या वयात पोटच्या गोळ्यांना रोजगाराभिमुख करायचे होते. कुणाचे हात पिवळे करायचे होते, तर कुणाचे बोट हातात घेऊन चालवायला शिकवायचे होते. नेमक्या त्याच वेळात कोरोनारूपी काळाने त्यांच्यावर झडप घातली. रथाच्या दोन चाकांपैकी एक चाक गळून पडले. आता एका चाकावरच रथ हाकायचा आहे; पण आम्ही न डगमगता पुढे जाणार असे बळ, आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. खरंच प्रशासनाचे हे  सकारात्मक पाऊल निश्चितच प्रेरणादायी आहे.  
प्रशासनाचा कारभार म्हटला की अधिकारी, कर्मचाऱ्यांतील बरबटपणा, मरगळ, लाचेची मागणी, जनतेची ससेहोलपट हेच चित्र  नजरेसमोर उभे राहते; परंतु प्रशासनातही काही लोक कर्तव्यतत्पर असतात हेसुद्धा तेवढंच खरं आहे. याचं ज्वलंत वास्तव कोरोनात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांना मदत करतेवेळी आली. गोंदियाचे प्रभारी जिल्हाधिकारी राजेश खवले व अर्जुनी मोरगावचे तहसीलदार विनोद मेश्राम हे आपल्या सहकाऱ्यांसह मदत व सांत्वना भेट देण्यासाठी झटताना दिसत आहेत.
कोरोनात अनेकांनी आपले मातृ-पितृ, वडीलधारी माणसं गमावली. कुणाच्या डोक्यावरचे छत्र हरपले, तर कुणी निराधार झाले.  त्याची भरपाई या जन्मात होणे कदापि शक्य नाही; पण पुढचं आयुष्य व्यतित करताना अन्नधान्यासाठी कुणासमोरही मृतकांच्या वारसांना पदर पसरण्याची वेळ येऊ नये याची व्यवस्था प्रशासनाने केली.
 

लोकमतचे मानले आभार 
- कोरोनाने आधारवड हरपलेल्यांच्या व्यथा लोकमतच्या माध्यमातून सातत्याने मांडल्या जात आहे. यामुळे अनेक मदतीचे आत गरजू परिवारांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. लोकमत कार्यालयातही मदतीसाठी दररोज फोन येत आहेत. मदतीचा ओघ सुरू झाल्याने आणि लोकमतने हा मुद्दा लावून धरल्याबद्दल जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी लोकमतचे आभार मानले.

प्राधान्याने अनुदानित बियाणे मिळणार 
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या वाणांचे सुधारित बियाणे वितरित करण्यात येत आहेत. कोरोना संसर्गामुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्या शेतकरी कुटुंबीयांना शासन अनुदानित बियाणे प्राधान्याने देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी ९ जून रोजी झालेल्या कृषी विभागाच्या आढावा बैठकीत दिले.

अन्नदाता सुखी भवचे दर्शन 
अन्नदाता सुखी भव, असं आपल्या संस्कृतीत म्हटलं जातं. या उक्तीचं दर्शन यातून घडताना दिसते. कौतुक या गोष्टीचं आहे, की कोणत्याही कामासाठी सामान्य माणसाला प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागतात, तरीसुद्धा वेळेवर कामे होत नाहीत. अनेक कागदं रंगवावी लागतात; पण तहसीलदार मेश्राम व त्यांच्या चमूने मृतकांच्या घरी जाऊन विशेष सहाय्य योजनेंतर्गत इंदिरा गांधी निराधार, कुटुंब साहाय्य योजनेंतर्गत आर्थिक मदत, विधवा योजनेंतर्गतची आवेदन पत्र भरून आणले. अंत्योदय योजनेंतर्गत महिन्याला ३५ किलो मोफत अन्नधान्य देण्याचे रेशन कार्ड घरी पोहचवून दिले. शिवाय विधवा महिलांना बहीण मानून साडी-चोळी व मुलांना ड्रेस भेट म्हणून दिला.
अनेक कुटुंबे आर्थिक संकटात
कोरोनापीडित कुटुंबे आर्थिक संकटात आहेत. राजोली येथील एका विधवेचे वय २८ वर्षे आहे. दोन मुले असून त्यांचे वय अवघे ५ व ९ वर्षांचे आहे. याच गावातील एका कुटुंबात आई-वडील नाहीत. दोन्ही  १६ व २१ वर्षांच्या मुलीच आहेत. मोरगाव येथील कमावता पुरुष गेला. ३२ वर्षांची पत्नी व १० वर्षांचा मुलगा आहे. खामखुरा येथील एका कुटुंबातील कर्ता पुरुष दगावला. ३० वर्षांची पत्नी व केवळ २ वर्षांचा चिमुकला आहे. सोबत वृद्ध आई-वडील आहेत. निमगाव येथील ५० वर्षीय विधवेला ११ वर्षांचा मुलगा आहे. एकंदरीत सर्वांची मुलं लहानच आहेत.

 

Web Title: Tears welled up in his eyes, but now the family is determined to live with courage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.