क्षेत्रनिहाय मेळाव्यांना आजपासून प्रारंभ

By Admin | Updated: December 8, 2014 22:36 IST2014-12-08T22:36:14+5:302014-12-08T22:36:14+5:30

स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात विविध कार्यक्रम राबवून स्वच्छता केली जात आहे. यांतर्गत येथील जिल्हा परिषदेने आदर्श ग्राम योजना हा उपक्रम हाती घेतला. यात जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा

Start of Regional Meetings from today | क्षेत्रनिहाय मेळाव्यांना आजपासून प्रारंभ

क्षेत्रनिहाय मेळाव्यांना आजपासून प्रारंभ

आदर्श ग्राम योजना : आमगावातून होणार श्रीगणेशा
गोंदिया : स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात विविध कार्यक्रम राबवून स्वच्छता केली जात आहे. यांतर्गत येथील जिल्हा परिषदेने आदर्श ग्राम योजना हा उपक्रम हाती घेतला. यात जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रात जनजागृती मेळाव्यांचे आयोजन केले जाणार असून या मेळाव्यांना ९ डिसेंबर रोजी आमगाव येथून प्रारंभ केला जाणार आहे.
सर्वत्र स्वच्छता अभियान राबविले जात असताना आपला जिल्हा यातून सुटू नये तसेच जिल्हा स्वच्छ व सुंदर रहावा यासाठी जिल्हा परिषदेने आदर्श ग्राम योजना हा उपक्रम हाती घेतला. उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील ५२ जिल्हा परिषद सदस्यांना त्यांच्या क्षेत्रातील एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास साधायचा आहे. यामुळे फक्त झाडू मारणे म्हणजे स्वच्छता नसून स्वच्छतेशी निगडीत अन्य बाबींबाबतही जनजागृती करून लोकसहभागातून गावांचा विकास साधणे या उपक्रमातून साध्य करायचे आहे. यासाठीच या जनजागृती मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहेत.
पंचायत समिती स्तरावरून या मेळाव्यांचे आयोजन केले जाणार असून यासाठी जिल्हा परिषद पंचायत विभागाने काही सूचना दिल्या आहेत. यात, रस्त्यांवरील हागणदारी बंद करणे, शौचालयांचा वापर करणे, व्यक्तिगत शौचालय बांधकामासाठी लाभ देणे, सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती, स्वच्छता व पाण्याची व्यवस्था करून त्यांचा वापर वाढविणे, बाजाराच्या ठिकाणी स्वच्छता ठेवणे, मुख्य चौक व सार्वजनिक जागांत स्वच्छता राखणे, विद्यार्थ्यांना शौचालयाच्या वापराची सवय लावणे आदिंचा समावेश आहे. मेळाव्यांतून वरील बाबींवर क्षेत्रातील लोकप्रतिनिधी व लोकांत जनजागृती केली जाणार आहे.
जिल्ह्यात ५२ जिल्हा परिषद क्षेत्र असून प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रात मेळावे घेतले जाणार आहेत. त्यानुसार ९ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या क्षेत्रातून या मेळाव्यांना प्रारंभ होत असून आमगाव येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
लोक प्रतिनिधींसह क्षेत्रातील लोकांत जनजागृती करून त्यांच्या सहभागातून गाव आदर्श गाव बनविण्याचे या उपक्रमांचे उद्दीष्ट असून जनजागृती नंतर गावात स्वच्छता अभियान राबविले जाणार असल्याचीही माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Start of Regional Meetings from today