सात वर्षीय बालकाला बिबट्याने नेले फरफटत; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

By अंकुश गुंडावार | Updated: April 11, 2026 20:12 IST2026-04-11T20:12:00+5:302026-04-11T20:12:44+5:30

Gondia : बहीण-भाऊ घरासमोरील अंगणात खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने सात वर्षीय बालकावर झडप घालून त्याला अडीशे मीटर फरफटत नेत ठार केल्याची घटना शुक्रवारी तालुक्यातील धाबेटेकडी आदर्श येथे घडली.

Seven-year-old boy mauled by leopard; body found in pool of blood | सात वर्षीय बालकाला बिबट्याने नेले फरफटत; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

Seven-year-old boy mauled by leopard; body found in pool of blood

अर्जुनी मोरगाव : बहीण-भाऊ घरासमोरील अंगणात खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने सात वर्षीय बालकावर झडप घालून त्याला अडीशे मीटर फरफटत नेत ठार केल्याची घटना शुक्रवारी (दि.१०) रात्री ९:३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील धाबेटेकडी आदर्श येथे घडली. प्रज्वल गोवर्धन मेश्राम (वय सात वर्षे) असे बिबट्याने ठार केलेल्या बालकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील धाबेटेकडी येथे गोवर्धन मेश्राम हे पत्नी, एक मुलगी, एक मुलगा यांच्यासोबत कायमस्वरूपी वास्तव्याने आहेत. प्रज्वल व त्याची नऊ वर्षाची मोठी बहीण घरासमोरील अंगणात शुक्रवारी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास खेळत होते. आई व इतर मंडळी घरात होती. दोघेही बहीण-भाऊ खेळण्यात दंग असताना बिबट्याने प्रज्वलवर झडप घालून बहिणीच्या समोरच जबड्यात पकडून फरफटत जंगलाच्या दिशेने नेले. याप्रकाराने घाबरलेल्या बहिणीने आरडाओरड केल्यानंतर कुटुंबीय व शेजारी धावून आले. बिबट्या ज्या दिशेने गेला त्या दिशेने धाव घेतली.

वन विभागाचे अधिकारी धावून आले

बिबट्याने बालकाला जीवनाशी ठार केल्याची माहिती होताच वन विभागाचे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी अविनाश मेश्राम, स्थानिक वनपरिक्षेत्राधिकारी राजेश बहुरे, बोंडगावदेवी राऊंडचे क्षेत्र सहायक रंजना भोगे, भांडारकर यांच्यासह शीघ्र बचाव दल रात्री घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे गावात अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के आपल्या ताब्यासह घटनास्थळी येऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.

रक्ताच्या थारोळ्यात आढळला प्रज्वलचा मृतदेह

संबंधित वन कर्मचारी व ग्रामस्थ यांनी बिबट्याने गेलेल्या मार्गावर शोधमोहीम राबविली. दरम्यान, सहवन क्षेत्र बोंडगावदेवी नियत क्षेत्र तिडका राखीव वन कक्ष क्रमांक ७४६ मध्ये गावापासून २५० मीटर अंतरावर प्रज्वल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. ग्रामस्थांच्या सहकार्याने येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून प्रज्वलला मृत घोषित केले.

शुक्रवारची रात्र ठरली मेश्राम कुटुंबीयासाठी काळरात्र

प्रज्वल हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. शुक्रवारची रात्र मेश्राम कुटुंबीयांसाठी काळरात्र ठरली. गावात येऊन बिबट्याने सात वर्षीय बालकाच्या नरडीचा घोट घेऊन जीवानिशी ठार केल्याने मेश्राम कुटुंबीयासह अख्खे गाव हळहळले. या घटनेनंतर गावकऱ्यांनी वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून बिबट्याला जेरबंद करा अशी मागणी लावून धरली. वनपरिक्षेत्राधिकारी राजेंद्र बहुरे तसेच पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी गावकऱ्यांची समजूत घालून रात्रीच शोधमोहीम सुरू केली.

ड्रोनच्या मदतीने बिबट्याचा शोध, पिंजरे लावले

ड्रोनद्वारे जंगलात बिबट्याचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबविली जात आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नवेगावबांध येथील शीघ्र बचाव दलास पाचारणसुद्धा करण्यात आले. जंगल परिसरात तीन पिंजरे लावण्यात आले. परंतु, शनिवारी सायंकाळपर्यंत बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले नव्हते. या परिसरात वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र बहुरे यांनी सांगितले. वन्यप्राण्यांचा जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात वावर आहे. हिंस्त्र प्राणी असल्याने एकट्याने जंगलामध्ये जाऊ नये. काही प्राणी आढळल्यास वन विभागाला त्वरित कळवावे असे वन विभागाने कळविले आहे.

कुटुंबाला तत्काळ एक लाखाची मदत

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पडणाऱ्याच्या कुटुंबीयांना २५ लाखांची आर्थिक मदत करण्यात येते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनपरिक्षेत्राधिकारी राजेंद्र बहुरे यांनी रात्रीच गावकऱ्यांच्या समक्ष प्रज्वलच्या आई-वडिलांना रोख एक लाखाची आर्थिक मदत केली.

जड अंत:करणाने अंत्यसंस्कार

शनिवारी सकाळी नऊ वाजता स्थानिक ग्रामीण रुग्णालयात प्रज्वलच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करून धाबेटेकडी येथे गावकरी तसेच वन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्याच्या पार्थिवावर जड अंत:करणाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title : महाराष्ट्र के गाँव में तेंदुए ने सात वर्षीय बालक को घसीटा, मार डाला

Web Summary : महाराष्ट्र के धाबेटेकडी में एक तेंदुए ने सात वर्षीय बालक की जान ले ली। तेंदुआ ने खेलते समय प्रज्वल मेश्राम पर हमला किया और उसे घसीट कर ले गया। वन विभाग के अधिकारी तेंदुए की तलाश कर रहे हैं, और परिवार को तत्काल वित्तीय सहायता मिली।

Web Title : Leopard Drags, Kills Seven-Year-Old Boy in Maharashtra Village

Web Summary : A seven-year-old boy was killed by a leopard in Dhabetekdi, Maharashtra. The leopard attacked Prajwal Meshram while he was playing and dragged him away. Forest officials are searching for the leopard, and the family received immediate financial assistance.