धावत्या रेल्वेगाडीत लूटमार

By Admin | Updated: May 3, 2015 01:21 IST2015-05-03T01:21:38+5:302015-05-03T01:21:38+5:30

गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावरील सौंदड रेल्वेस्थानकापासून तीन किमी. अंतरावर धावत्या रेल्वेगाडीत व्यापाऱ्यांवर चाकूने हल्ला करुन

Robbery in a moving train | धावत्या रेल्वेगाडीत लूटमार

धावत्या रेल्वेगाडीत लूटमार

गोंदिया : गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावरील सौंदड रेल्वेस्थानकापासून तीन किमी. अंतरावर धावत्या रेल्वेगाडीत व्यापाऱ्यांवर चाकूने हल्ला करुन चौघांनी सव्वापाच लाख रुपयांची रक्कम पळविली. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर गोंदिया व परिसरातील व्यापाऱ्यांसह प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
ब्रम्हपुरी येथील आठवडी बाजारात वसुलीकरिता येथील इलेक्ट्रॉनिक्स सामानाचे ठोक व्यापारी चंद्रभान विरुमल जसुजा, होजीयरी व्यापारी अश्विनी महेंद्रभाई शाहू, कपडा व्यापारी कन्हैय्या रामचंद अनवाणी व एका तेल व्यापाऱ्यांचा मुनीम किशोर ध्यानचंद डंबानी हे गेले होते. दिवसभर वसुली करुन सायंकाळी चंद्रपूर-गोंदिया रेल्वेगाडीच्या बोगी नंबर ११४०६ मध्ये ते बसले. सौंदडपर्यंतचा प्रवास सुरळीत झाला. मात्र त्यानंतर तीन किमी. अंतरावर अचानक तोंडावर रुमाल बांधून चार अज्ञात व्यक्ती चाकू घेऊन शिरले. यातील दोघांनी प्रवाशांना धमकाविले तर दोघांनी व्यापाऱ्यांवर चाकूने हल्ला करून त्यांच्याजवळील सव्वा पाच लाख रुपयांची रक्कम हिसकावली व चेन पुलिंग करुन अंधाराचा लाभ घेत खोडशिवणीच्या जंगलात पळून गेले.
दरम्यान रेल्वेगाडी थांबताच गार्डने घटनेची माहिती गोंदिया रेल्वे पोलिसांना दिली. ही माहिती गोंदिया शहरात पोहोचताच शहरातील व्यापाऱ्यांनी रात्री ९ वाजताच्या सुमारास रेल्वेस्थानकावर एकच गर्दी गेली होती. रेल्वेगाडी गोंदिया रेल्वेस्थानकावर पोहोचताच जखमी व्यापाऱ्यांवर रेल्वे रुग्णालयात उपचार करण्यात आले. सदर प्रकरणी रेल्वे पोलिसांनी ३ पथके तयार करुन अज्ञात आरोपींचा शोध सुरु केला आहे.

Web Title: Robbery in a moving train