विदर्भातील 'या' जिल्ह्यात चार दिवस बहुतांश भागांत पावसाचा अंदाज, कोणत्या पिकांना बसणार फटका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 17:47 IST2025-09-26T17:39:47+5:302025-09-26T17:47:07+5:30
बहुतांश भागांत पावसाचा अंदाज : २४ तासांत सरासरी २३ मिमी पाऊस बरसला

'Yellow alert' for 'this' district of Vidarbha for four days! Rain forecast in most parts, which crops will be affected?
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सप्टेंबर महिन्यात फक्त सरींपुरताच मर्यादित राहिलेला पाऊस अचानकच परतून आला असून, बुधवारी (दि. २४) रात्रीपासून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. २४ तासांत म्हणजेच गुरुवारी (दि. २५) सकाळी १०:३२ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २३ मिमी पाऊस बरसला आहे. याशिवाय पुढील चार दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला असून, बहुतांश भागांत पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत सरासरी १२२०.३ मिमी पाऊस अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत सरासरी ११२६ मिमी पाऊस बरसला आहे. अशात उरलेल्या पाच दिवसांमध्ये सरासरी ९४.३ मिमी पाऊस बरसणे गरजेचे आहे. मात्र, सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारली असून, बरसला तरी हलक्या सरीच बरसल्या आहेत.
यामुळे अपेक्षित पाऊस होणार, अशी शक्यता कमीच वाटत आहे. मात्र, बुधवारी (दि. २४) अचानकच पावसाने परत एंट्री मारली असून, रात्री काही भागांत दमदार पाऊस बरसला आहे. गुरुवारी (दि. २५) घेण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, २४ तासांत सरासरी २३ मिमी पाऊस बरसला आहे. पावसाच्या आगमनाने शेतकरी व सर्वसामान्य सुखावले असतानाच हवामान खात्याने जिल्ह्याला पुढील चार दिवस येलो अलर्ट दिला आहे. अशात आता उरलेल्या पाच दिवसांत सरासरी ९४.३ मिमी पाऊस होणे गरजेचे आहे.
वादळी पावसाचा धानपिकाला फटका
बुधवारी रात्री आणि गुरुवारी (दि. २५) सकाळच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी पावसामुळे धानपीक झोपून गेल्याने धान खराब होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच हवामान विभागाने पुढील चार दिवसांचा पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडली आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात दमदार
- बुधवारी पावसाने परत एंट्री केली असून, जिल्ह्यात सरासरी २३ मिमी पाऊस बरसला.
- यामध्ये अर्जुनी-मोरगाव तालुक्यात दमदार पाऊस झाला असून, ४२.६ मिमी नोंद घेण्यात आली आहे.
- देवरी तालुक्यात ३९.८ मिमी ३ पाऊस बरसला आहे. अशाच प्रकारे पाऊस बरसल्यास अपेक्षित आकडेवारी गाठता येणार यात शंका नाही.