जिल्ह्यात केवळ पाच हेक्टरमध्येच रोवणी

By Admin | Updated: July 7, 2014 23:38 IST2014-07-07T23:38:11+5:302014-07-07T23:38:11+5:30

आतापर्यंत संपूर्ण जिल्हाभरात १५ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रामध्ये रोपवाटिका टाकण्यात आल्या. मात्र हवा तसा दमदार पाऊस अद्यापही पडला नाही. त्यामुळे जिल्हाभरातील २५ ते ३० टक्के रोपवाटिका करपल्या आहेत.

Only in five hectare of the plant, the seedlings | जिल्ह्यात केवळ पाच हेक्टरमध्येच रोवणी

जिल्ह्यात केवळ पाच हेक्टरमध्येच रोवणी

देवानंद शहारे - गोंदिया
आतापर्यंत संपूर्ण जिल्हाभरात १५ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रामध्ये रोपवाटिका टाकण्यात आल्या. मात्र हवा तसा दमदार पाऊस अद्यापही पडला नाही. त्यामुळे जिल्हाभरातील २५ ते ३० टक्के रोपवाटिका करपल्या आहेत. या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत केवळ पाच हेक्टरमध्येच रोवणी करण्यात आल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.
आज येईल, उद्या येईल, परवा येईल अशा आशेने शेतकरी दररोज आपल्या शेतात जाऊन आकाशाकडे नजरा लावून बसत आहे. मात्र पाऊस पडण्याचे कसलेही संकेत दिसत नाही. त्यामुळे शेतकरी पुरता वैतागून गेला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आवत्या करण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच हजार ८८४ हेक्टर क्षेत्रामध्ये आवत्या टाकण्यात आल्या आहेत. यंदा आवत्यांच्या क्षेत्र देवरी तालुक्यात सर्वाधिक असून तेथे चार हजार ४५४ हेक्टर क्षेत्रात आवत्या घालण्यात आल्या आहेत. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत सर्वाधिक आवत्यांचे क्षेत्र देवरी तालुक्याचेच होते. तेथे पाच हजार २१५ हेक्टर क्षेत्रामध्ये आवत्या घालण्यात आल्या होत्या.
सन २०१३ मध्ये आजच्या तारखेपर्यंत जिल्ह्यात नऊ हजार ९६५ हेक्टर क्षेत्रामध्ये आवत्या घ्\ाालण्यात आल्या होत्या. तर आता सन २०१४ च्या आजपर्यंत जिल्ह्यात केवळ पाच हजार ८८४ हेक्टर क्षेत्रात आवत्या घालण्यात आल्या आहेत. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत यंदा तब्बल चार हजार ८१ हेक्टर क्षेत्रात आवत्या कमी घालण्यात आल्या आहेत. आवत्यांची संख्या वाढणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, साधारणत: पावसाच्या पाण्यावर भाताचे पऱ्हे किंवा रोपवाटिका टाकली जाते. तसेच नियोजनही शेतकरी करतात. मात्र जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने टाकलेल्या धानाचे पऱ्हे व रोपवाटिका वाळत आहेत. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असून प्रतिकूल परिस्थितीत भात लागवड पद्धतीत बदल केल्यास उत्पादनातील घट टाळता येऊ शकते, असे कृषी अधीक्षकांनी सांगितले.
ज्या शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकलेले आहेत व त्यांची उगवण प्रमाणापेक्षा कमी असल्यास शेतकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने (जपानी पद्धतीने) चिखलनी झाल्यानंतर आलेल्या पऱ्ह्याची रोवणी करावी. यात दोन रोपातील अंतर किमान २० ते २५ सेमी ठेवावे. चुडातील रोपांची संख्या दोन ते तीन ठेवावे. रोपाचा कालावधी १२ ते १५ दिवस असावा. तसेच कमी कालावधीचे वाण वापल्याने उत्तम असते. दोन रोपातील अंतर वाढत असल्याने हवा व सूर्यप्रकाश पिकांमध्ये खेळत असते. दुबार पेरणी करावयाची असल्यास आवत्यांची तिफनीने पेरणी करावी. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही उत्तमप्रकारे धानाचे उत्पादन घेता येते, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरील यांनी सांगितले.

Web Title: Only in five hectare of the plant, the seedlings