गोरेगावातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना अखेरची घरघर

By Admin | Updated: July 6, 2014 23:59 IST2014-07-06T23:59:33+5:302014-07-06T23:59:33+5:30

तालुक्यात राज्यशासन व जिल्हा परिषदेचे एकूण सात पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. पण दवाखान्यात शासनाच्या मुबलक सुविधा नाही. पाण्याची व्यवस्था नाही, बोरवेल बंद आहेत वैद्यकीय अधिकारी

The last house in Goregaon veterinary hospitals | गोरेगावातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना अखेरची घरघर

गोरेगावातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना अखेरची घरघर

दिलीप चव्हाण - गोरेगाव
तालुक्यात राज्यशासन व जिल्हा परिषदेचे एकूण सात पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. पण दवाखान्यात शासनाच्या मुबलक सुविधा नाही. पाण्याची व्यवस्था नाही, बोरवेल बंद आहेत वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे दवाखान्याचा कारभार परिचर चालवतात. त्यामुळे शासनाच्या या पशुवैद्यकीय दवाखान्यांना अखेरची घरघर लागली आहे.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील गोरेगाव, चोपा, कुऱ्हाडी, तेढा या गावात जिल्हा परिषद अधिनस्थ पशुवैद्यकीय दवाखाने चालविले जातात. हिरडामाली, मोहाडी, मुंडीपार हे तीन दवाखाने राज्य शासनाच्या अधिनस्थ आहेत. यापैकी गोरेगाव येथील दवाखान्यात तीन वर्षापासून बोरवेल बंद आहे. त्यामुळे या दवाखान्यात पाण्याची सोय नाही. कुऱ्हाडीच्या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे येथे जनावरावर उपचार परिचर करतात. तेढा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पाण्याची सोय नाही. येथे पाण्यासाठी कर्मचाऱ्यांना इतरत्र भटकावे लागते. हिरडामाली येथील दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी व पाण्याची सोय नाही. मोहाळीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातही पाणी व वैद्यकीय अधिकारी नाही. मुंडीपारच्या दवाखान्यात पाणी, परिचर व पशुवैद्यकीय अधिकारी नाही. सदर दवाखाना आठवड्यातून एकदा उघडला जातो.
गोरेगाव तालुक्यात राज्यशासन व जिल्हा परिषद अधिनस्थ सात पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. पण शासनाच्या मुबलक सुविधा नसल्यामुळे पशुपालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. पशु दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे अनेकवेळा जनावरांचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. पशुपालक उपचारासाठी दवाखान्यात जनावरे घेऊन येतात. तेव्हा पशुपालकांनाही जनावराच्या पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते. गुराच्या जखमा धुण्यासाठी, हात धुण्यासाठी पशु दवाखान्यात पाणी मोठ्या प्रमाणावर लागतो.मात्र पाण्याची सोय नसल्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
एकीकडे पाण्याचा भीषण प्रश्न कायम असताना दुसरीकडे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा अभाव पशुपालकांसाठी घातक ठरत आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी जनावरे पोसावे लागतात. बदलत्या हवामानामुळे व पावसाळ्यात जनावराना मोठ्या प्रमाणात रोग होण्याची संभावना राहते. मात्र रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी व योग्य उपचारासाठी पशुवैद्यकीय अधिकारी नाही ही मोठी समस्या आहे.

Web Title: The last house in Goregaon veterinary hospitals