दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत द्या

By Admin | Updated: July 9, 2014 23:37 IST2014-07-09T23:37:34+5:302014-07-09T23:37:34+5:30

पावसाने हुलकावणी दिल्याने धानपिकावर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट येऊन पडले आहे. काही शेतकऱ्यांनी तयार केलेली धानाची नर्सरी वाया गेली. त्यामुळे त्यांना दुबार पेरणीसाठी

Help farmers to sow sowing | दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत द्या

दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत द्या

गोंदिया : पावसाने हुलकावणी दिल्याने धानपिकावर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट येऊन पडले आहे. काही शेतकऱ्यांनी तयार केलेली धानाची नर्सरी वाया गेली. त्यामुळे त्यांना दुबार पेरणीसाठी शासनाने बियाणे, खत व आर्थिक मदत देण्याची मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केली आहे.
मृग नक्षत्रात बरसलेल्या पावसाने नंतर हुलकावणी दिल्याने धानाच्या नर्सरी करपून गेल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन त्यांना पुन्हा पेरणीसाठी बियाण्यांचे जुळवाजुळव करावी लागत आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीपाच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर रबी हंगामात गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान केले. गेल्या काही वर्षात अशा प्रकारे या ना त्या निमित्ताने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. गेल्यावर्षी ही मदतीची मागणी रेटून धरल्यानंतर शासनाने मदत जाहीर केली. परंतु अजूनही अनेक शेतकऱ्यांपर्यंत त्या मदतीची रक्कम पोहोचलीच नाही.
यावर्षीही शेतकऱ्यांना पुन्हा दुष्काळाचा सामना करावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी विनोद अग्रवाल यांनी केली आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे व इतर मागणी करणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

Web Title: Help farmers to sow sowing