मुंबई-हावडा रेल्वे मार्गाचे विद्युत तार तुटले

By Admin | Updated: December 20, 2014 01:44 IST2014-12-20T01:44:17+5:302014-12-20T01:44:17+5:30

मुंबई ते हावडा या रेल्वेमार्गावर गुरूवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास भंडारा ते कोका दरम्यान समरसता एक्सप्रेसचा पेंटो तुटला.

The electrifying board of the Mumbai-Howrah railway route is broken | मुंबई-हावडा रेल्वे मार्गाचे विद्युत तार तुटले

मुंबई-हावडा रेल्वे मार्गाचे विद्युत तार तुटले

गोंदिया : मुंबई ते हावडा या रेल्वेमार्गावर गुरूवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास भंडारा ते कोका दरम्यान समरसता एक्सप्रेसचा पेंटो तुटला. त्यामुळे नागपूर ते रायपूर मार्गावरून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या एक ते दीड तास विलंबाने धावल्या. त्यामुळे प्रवाशांना हिवाळ्याच्या या दिवसात खूप त्रास सहन करावा लागला.
मुंबई ते हावडाकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर भंडारा रेल्वे स्थानकातून समरसता एक्सप्रेस (१२१५१) सुटल्यानंतर भंडारा ते कोकादरम्यान सदर रेल्वेगाडीला विद्युत कनेक्शन जोडणारा पेंटो तुटल्यामुळे गाडीचा विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे दीड तासापर्यंत रेल्वेमार्ग बाधित झाला. यानंतर रेल्वेचे विद्युत कर्मचारी घटनास्थळी पोहचले. पेंटोची सुधारणा करून पुन्हा विद्युत पुरवठा पूर्ववतपणे सुरळीत करण्यात आला. या प्रकारामुळे नागपूर ते रायपूरकडे जाणाऱ्या सर्व एक्सप्रेस व लोकल रेल्वेगाड्या दीड तास विलंबाने धावल्या.
रेल्वेगाड्या विलंबाने धावत असल्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकात मोठ्या संख्येत प्रवाशांची गर्दी आढळली. त्यातच सध्याच्या दिवसात गोंदिया जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडत आहे. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसरात थांबलेल्या प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रवाशी गाड्यांसह मालगाड्यांच्या येण्या-जाण्यावरसुद्धा याचे विपरित परिणाम पडले. परंतु रायपूर ते नागपूरकडे जाणारा मार्ग खुला असल्यामुळे या मार्गावर समस्या निर्माण झाली नाही. मात्र विलंबाने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांत रोष दिसून आला.
या प्रकाराबाबत गोंदिया रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक आर.एन. कर यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, समरसता एक्सप्रेसला विद्युत कनेक्शन जोडणारा पेंटो तुटण्याची माहिती मिळताच विद्युत कर्मचाऱ्यांचा दल तत्काळ रवाना करण्यात आला. तिथे सुधार कार्य करून गाड्यांचे परिचालन सुरळीत करण्यात आले, असे ते म्हणाले.

Web Title: The electrifying board of the Mumbai-Howrah railway route is broken