'टीईटी' परीक्षेत 'फोटो व्ह्यू' प्रणाली ओळखणार डमी उमेदवार; परीक्षेत उमेदवारांवर एआय ठेवणार लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 18:51 IST2025-11-19T18:47:29+5:302025-11-19T18:51:20+5:30
जिल्हाभरात आठ हजार ४६८ उमेदवार देणार परीक्षा : परीक्षेत उमेदवारांवर नजर ठेवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे

Dummy candidates will be identified by the 'Photo View' system in the 'TET' exam; AI will keep an eye on candidates in the exam
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयोजित होणारी राज्य शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी (दि.२३) होणार आहे. यंदा परीक्षार्थीवर लक्ष ठेवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. डमी उमेदवारांची ओळख पटविण्यासाठी प्रथमच फोटो व्ह्यू प्रणाली तयार करण्यात आली असून, हातात मोबाइल असल्यास हॅण्ड-होल्ड डिटेक्टरद्वारेही तपासणी केली जाणार आहे. प्रशासनाने बायोमेट्रिक नोंदणी, फेस रेकग्निशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित थेट प्रक्षेपण प्रणाली लागू केली आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्रासोबत मूळ ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यातील आठ हजार ४६८ उमेदवार टीईटी परीक्षेला बसणार आहेत. यासाठी जिल्ह्यात एकूण १७ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या पेपरसाठी १६ केंद्रे असून, चार हजार १६९ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. तर पेपर-२ करिता १७ केंद्रे असून चार हजार २९९ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर दिघोरे यांनी दिली आहे.
१७ केंद्रांवर आठ हजार ४६८ उमेदवार देणार परीक्षा...
जिल्ह्यात पहिल्या पेपरसाठी १६ केंद्रे असून चार हजार १६९ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. तर पेपर-२ करिता १७केंद्रे असून, चार हजार २९९ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.
डमी उमेदवारांचा चेहरा उघड
फोटोमुळे उमेदवाराच्या चेहऱ्याची ओळख पटवणे सुलभ होणार आहे. बोगस उमेदवार आल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
बायोमेट्रिक व फेस स्कॅनिंग
परीक्षा देण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली कायम असून, याबरोबरच फेस स्कॅनिंगही वापरली जाणार आहे. सर्वच शिक्षकांना ही परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आल्याने यंदा परीक्षार्थीची संख्याही वाढली आहे.
एआय सीसीटीव्ही नजर
शिक्षक पात्रता परीक्षेच्या परीक्षार्थीवर करडी नजर ठेवण्यासाठी तसेच गैरप्रकार टाळण्यासाठी एआय सीसीटीव्हीचा वापर केला जाणार आहे.
हे साहित्य आणण्यास मनाई
कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स उपकरण त्यामध्ये कॅल्क्युलेटर, मोबाइल फोन, स्मार्ट वॉच, ब्लू टूथ डिव्हायसेस, इलेक्ट्रॉनिक्स पेन तसेच छापील किंवा लिहिलेले कागद नेण्यास मनाई केली आहे.
फोटो व्ह्यू आणि कनेक्ट व्ह्यू प्रणाली
फोटो व्ह्यूमुळे परीक्षार्थीची माहिती व चेहऱ्याची पडताळणी होईल, तर कनेक्ट व्ह्यूमुळे केंद्र संचालक, परीक्षा संनियंत्रण कक्ष, परीक्षा परिषद यांच्याकडे हॉट लाइन फोनमुळे तत्काळ संपर्क होईल.
दोन सत्रांत होणार परीक्षा...
पेपर पहिलीची वेळ सकाळी १०:३० ते १ आणि पेपर २ ची वेळ दुपारी २:३० ते ५ अशी असणार आहे.
ही कागदपत्रे हवीत
टीईटी परीक्षेसाठी आधार कार्ड, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, जन्मतारीख प्रमाणपत्र, श्रेणी-जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे.
"टीईटी परीक्षा पारदर्शकरीत्या पार पाडण्याच्या अनुषंगाने शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असून कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषदेमधील अधिकाऱ्यांची झोनल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. यासोबतच उमेदवार तपासणीसाठी फोटो व्ह्यू व कनेक्ट व्ह्यू या प्रणालीचा वापर होणार आहे."
- विलास डोंगरे, शिक्षणाधिकारी, गोंदिया