Donate funds for MGNREGA work | मनरेगाच्या कामाचा थकीत निधी द्या
मनरेगाच्या कामाचा थकीत निधी द्या

ठळक मुद्देसरपंच सेवासंघाची मागणी : जि.प.मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मनरेगाच्या माध्यमातून सन २०१७-१८ व २०१८-१९ मधील ग्रामपंचायतस्तरावर झालेल्या विकास कामातील कुशल कामाचा निधी अद्याप उपलब्ध न झाल्याने इतर विकास कामात अडथळा निर्माण होत आहे. तरी शासनाने ग्रामपंचायत स्तरावरील साहित्य पुरवठ्याचा सर्व निधी त्वरीत उपलब्ध करुन द्यावा, अन्यथा होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर ग्रामपंचायत स्तरावर बहिष्कार टाकणार असा ईशारा जिल्हा सरपंच सेवा महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे आणि जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात, सरपंच सेवा संघाने सन २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये मनरेगाच्या माध्यमातून जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर रस्ते, तलाव खोलीकरण, पाईप पूल, वनतलाव, नाला सरळीकरण अशी अनेक प्रकारची विकास कामे करण्यात आली. या कामांमधील कुशल कामांकरिता लागणाऱ्या साहित्य पुरवठ्याची ऑनलाईन निविदा काढून त्यात अटी व शर्ती प्रमाणे निविदा मागवून पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले. ही सर्व प्रक्रिया ग्रामपंचायतस्तरावर सारख्याच प्रकारे करण्यात आली होती. या सर्व कामांना दोन वर्षांचा कालावधी लोटूनही आणि वारंवार या कामांची चौकशी होऊन सुद्धा या कुशल कामांचा निधी अद्याप उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही.
या बाबतीत सर्व गटविकास अधिकाऱ्यांसोबत सतत पाठपुरावा करण्यात आला आहे. मनरेगा अंतर्गत झालेल्या सर्व कामांचा निधी सात दिवसांच्या आत उपलब्ध करुन द्यावा, त्यानंतरच नवीन कामांची मागणी केली जाईल. या सर्व मागण्या पूर्ण न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. शिष्टमंडळात सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष कमल येरणे, सरचिटणीस नितीन टेंभरे, जि.प.सदस्य सुरेश हर्षे, गंगाधर परशुरामकर, जिल्हा समन्वयक नरेंद्र शिवणकर, आमगाव तालुका सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष सुनील ब्राम्हणकर, सरपंच सुनंदा उके, शोभा मेश्राम, अनिता आगरे, भारती येडे, सुनिता तुरकर, रामेश्वर शेंडे यांचा समावेश होता.


Web Title: Donate funds for MGNREGA work
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.