भरधाव कार ५० फूट फरफटत झाडावर धडकली; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, एक जण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 18:59 IST2026-01-03T18:58:55+5:302026-01-03T18:59:41+5:30
मुरदोलीजवळील घटना : कोहमाराकडे जात असताना झाला अपघात

A speeding car crashed into a tree, hurtling 50 feet; a young man died, one person is in critical condition
गोरेगाव : कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्यालगतच्या झाडावर धडकून १ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाल्याची शनिवारी (दि. ३) दुपारी ११:४५ वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील मुरदोलीजवळ घडली. रुपेश नरेश भोगारे (वय २३) रा. पिंडकेपार, ता. गोरेगाव असे मृतकाचे तर प्रफुल्ल पटले (वय २३) रा. तुमखेडा तालुका गोरेगाव असे जखमीचे नाव आहे. जखमी प्रफुल्लवर गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार रुपेश हा शनिवारी दुपारी आपल्या मित्रासोबत गोरेगावहून कोहमाराच्या दिशेने कार क्रमांक एम.एच.३५ ए.जी. ३९५८ ने जात होता. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार मुख्य रस्त्यापासून ५० फूट अंतरावर फरफट जात रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन धडकली. यात रुपेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर प्रफुल्ल गंभीर जखमी. या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. तसेच या घटनेची माहिती गोरेगाव पोलिस स्टेशनला दिली. माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. जखमी प्रफुल्लला लगेच गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. पंचनामा करून रुपेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे पाठविला. गोरेगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला अपघात
रुपेश आणि प्रफुल्ल हे दोघेही चांगले मित्र आहे. शनिवारी सकाळी ते कारने कोहमाराकडे जात होते. कारचा वेग अधिक असल्याने व चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात घडला. कार झाडावर धडकण्यापूर्वी तीन ते चार वेळा उलटल्याचे या मार्गावरून जात असल्याने वाहन चालकांनी सांगितले.
मुरदोली झाले अपघातप्रवण स्थळ
गोंदिया-कोहमारा मार्गावरील मुरदोली जवळ अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. हा मार्ग वळणदार आणि जंगलातून गेला असल्याने बरेचदा वन्यप्राणी रस्ता ओलांडत असताना अपघातात हाेतात. त्यामुळे मुरदोली हे अपघातप्रवण स्थळ झाले आहे.