‘त्या’ १३ मजुरांनी पायीच गाठले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:00 AM2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:00:44+5:30

पहाटेला निघालेल्या त्या १३ मजुरांना काही अंतरावर ट्रॅक्टर मिळाला. त्यांनी काही अंतर ट्रॅक्टर बसून प्रवास केला. रस्त्यामध्ये भेटलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहकार्य करून प्रवास करताना वाहनांची सोय करून दिली. भंडारा जिल्ह्यातील साकोली इथे त्यांना रात्र झाली. एका सभ्य नागरिकास पायी-पायी जाताना ते १३ मजूर दिसून आले. त्या सुज्ञ गृहस्थाने मोठ्या आस्थेनी विचारपूस करून त्यांच्या जेवनाची व्यवस्था केली.

13 laborers reached home on foot | ‘त्या’ १३ मजुरांनी पायीच गाठले घर

‘त्या’ १३ मजुरांनी पायीच गाठले घर

Next
ठळक मुद्देअसह्य वेदना मात्र गावाची ओढ : स्वत:च्या घरात अलगीकरण, लॉकडाऊनचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी (पिंपळगाव) येथील मजुरी करुन कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी १३ मजूर नागपूर जिल्ह्यातील मौदा परिसरात वीस दिवसांपूर्वी गेले होते. अशातच लॉकडाऊन करून संचारबंदी करण्यात आली. गावाला परत कसे जाणार याची चिंता त्यांना सतावू लागली. कुटुंबाच्या आठवणीने मन विचलीत होऊ लागले. अशात त्या १३ मजुरांनी संकल्प करून रविवारला (दि.५) पहाटे ३ वाजता परसाळ (गुंथारा) गावातून स्वगावी येण्यासाठी पायीच प्रवास सुरू केला. रात्रंदिवस पायी चालून सोमवारी त्यांनी आपले गाव गाठले.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील खांबी येथील मजूर गावात रोजगार नाही म्हणून काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील परसाळ (गुंथारा) येथे गहू कापणीच्या कामासाठी गेले होते.मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी १३ मजूर गाव सोडून शेकडो किमी अंतरावर राबण्यासाठी गेले होते. गावातून गेलेल्या त्या मजुरांनी त्या ठिकाणी काही दिवस गहू कापणीचे काम सुद्धा केले.
अशातच जिवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू करून संचारबंदी करण्यात आली. शासनाने जिथे आहात तिथेच थांबा असे आदेश सर्वत्र धडकले. कोरोना विषाणूची अनेकांनी चांगलीच धास्ती घेतली. खांबीवरून रोजगारासाठी गेलेल्या त्या १३ मजुरांना घराची ओढ लागली. मुलाबाळांच्या भवितव्याची चिंता मनोमन सतावू लागली. काही झाले तरी आता आपण आपल्या गावाला जावून कुटुंबासोबत राहायचे असा त्यांनी संकल्प केला. मौदा तालुक्यातील परसाळ या गावावरून रविवारी (दि.५) पहाटे ३ वाजता आपले सामान डोक्यावर घेऊन गावाला येण्यासाठी पायी-पायीच निघाले.
पहाटेला निघालेल्या त्या १३ मजुरांना काही अंतरावर ट्रॅक्टर मिळाला. त्यांनी काही अंतर ट्रॅक्टर बसून प्रवास केला. रस्त्यामध्ये भेटलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहकार्य करून प्रवास करताना वाहनांची सोय करून दिली. भंडारा जिल्ह्यातील साकोली इथे त्यांना रात्र झाली. एका सभ्य नागरिकास पायी-पायी जाताना ते १३ मजूर दिसून आले. त्या सुज्ञ गृहस्थाने मोठ्या आस्थेनी विचारपूस करून त्यांच्या जेवनाची व्यवस्था केली.सावरबांधच्या बस स्थानकात त्यांनी थोडा विश्रांती घेतली. सोमवारी (दि.५) पहाटेच्या ४ वाजता चान्ना बाक्टी या गावात त्यांनी प्रवेश केला.या सर्व १३ मजुरांची नोंदणी वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे यांनी करून त्यांची प्राथमिक तपासणी करून मार्गदर्शन केले. त्यांच्या हातावर अलगीकरणाचा शिक्का मारण्यात आला. लोकमत प्रतिनिधीने खांबीचे सरपंच प्रकाश शिवणकर, पोलीस पाटिल नेमीचंद मेश्राम यांच्याशी संपर्क साधून त्या मजुरांना गावी नेण्यासाठी व्यवस्था करण्यासंबधी चर्चा केली. सकाळी १० वाजता त्यांनी स्वगावी खांबी येथे नेवून जि.प.शाळेत तात्पुरती व्यवस्था करून त्या सर्वांना जेवण दिले. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांनी सुद्धा भेट देऊन त्यांना घराबाहेर निघू नका असा हितोपदेश केला.

Web Title: 13 laborers reached home on foot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.