आमदार वीरेशवर कारवाई होणार? 'आरजी'तील वाद मिटेना; बैठकीकडे आमदारांनी फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 14:11 IST2026-05-19T14:11:27+5:302026-05-19T14:11:43+5:30

रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षातील वादाने आता टोक गाठल्याचे दिसून येत आहे.

will action be taken against mla viresh borkar the controversy in revolutionary goans party is not resolved mla turned their backs on the meeting | आमदार वीरेशवर कारवाई होणार? 'आरजी'तील वाद मिटेना; बैठकीकडे आमदारांनी फिरवली पाठ

आमदार वीरेशवर कारवाई होणार? 'आरजी'तील वाद मिटेना; बैठकीकडे आमदारांनी फिरवली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षातील वादाने आता टोक गाठल्याचे दिसून येत आहे. पक्षाने आमदार वीरेश बोरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावून काल, सोमवारी कार्यालयात स्पष्टीकरण देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. पण, आमदार बोरकर यांनी आपण कामानिमित्त परराज्यात असल्याचे कारण देत बैठकीकडे पाठ फिरवली. त्यानंतर पुन्हा पक्षाध्यक्ष मनोज परब यांनी, 'कोणीही पक्षाला हलक्यात घेऊ नये. पक्ष सर्वोच्च आहे, पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, असे सुनावले. त्यामुळे आता पक्षाकडून वीरेश यांच्यावर कारवाई केली जाईल अशी चर्चा सुरू आहे.

सोमवारी मनोज परब, खजिनदार अजय खोलकर आणि सरचिटणीस विश्वेश नाईक यांनी पुन्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. परब म्हणाले की, 'वीरेश बोरकर यांना जेव्हा चर्चा करायची इच्छा असेल, तेव्हा आम्ही चर्चेसाठी पूर्णपणे तयार आहोत. त्यांना आमच्यासोबत संवाद साधायचा असल्यास आमचे दरवाजे खुले आहेत. जर वीरेश यांना माझ्यासह अजय आणि विश्वेश या तिघांसोबत बैठक घ्यायची नसेल, तरीही आम्ही त्यांच्या पसंतीनुसार कोणत्याही दोन प्रतिनिधींमार्फत चर्चा करण्यास तयार आहोत. पण, आमदार बोरकर यांनी कार्यालयात येऊ स्पष्टीकरण द्यावे,' असे आवाहन त्यांनी केले. 'आमदार बोरकर पक्षात असतील अथवा किंवा नसतील, त्यांच्यावरील आपले प्रेम कायम आहे' असे ते म्हणाले.

पक्षाला हलक्यात घेऊ नये : मनोज

दरम्यान पत्रकारांनी, 'वीरेश हे पक्ष सोडतील का?' असे विचारले असता मनोज म्हणाले की, 'याबाबत मला अद्याप काहीच स्पष्टता नाही. पण, पक्षाला कोणीही हलक्यात घेऊ नये. वीरेश पक्षात राहिले किंवा पक्षाबाहेर गेले. तरी त्यांच्याबद्दलची आपुलकी आणि प्रेम कायम राहील.'

सत्तेसाठी राजकारणात आलो नाही : वीरेश

'मी कधीही सत्तेसाठी राजकारणात आलो नाही, तर गोव्यासाठी आलो,' असे आमदार वीरेश बोरकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, गोव्यावरील प्रेम, राज्याची ओळख आणि भविष्यासाठीची लढाई हीच आपल्या राजकीय प्रवासाची प्रेरणा आहे. मी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या काळात एक महत्त्वाचा धडा शिकलो की जनतेसाठी उभे राहायचे असेल, तर जनतेसाठी त्रास सहन करण्याची तयारी ठेवावी लागते. अन्यायासमोर शांत राहणे सर्वात मोठा विश्वासघात आहे.

राजकीय घडामोडी व बैठकीच्या वेळा जुळतीलच असे नाही

दरम्यान, बैठकीला न येण्याबाबतची भूमिका मांडताना आमदार बोरकर यांनी म्हटले आहे की, 'सध्या गोव्याबाहेर काही महत्त्वाच्या बैठकांमध्ये मी सहभागी असून, त्या बैठका आधीच निश्चित झालेल्या आहेत. राजकीय घडामोडी आणि बैठकीच्या वेळा नेहमीच एकमेकांशी जुळतील, असे नसते', असे त्यांनी नमूद केले. सध्याच्या आपल्या बैठका पूर्ण झाल्यानंतरच योग्य वेळ ठरवून बैठक घेता येईल, असा प्रस्तावही त्यांनी पक्षनेतृत्त्वास दिला आहे. त्याचबरोबर आपण पक्षाप्रती पूर्ण आदर, बांधिलकी आणि स्पष्ट भूमिकेसह उपलब्ध आहोत, असे बोरकर यांनी निवेदनात म्हटले आहे. बैठकीस सर्वांत योग्य वेळ निश्चित करण्यासाठी आपल्या कार्यालयामार्फत संपर्क साधला जाईल, असेही आमदार बोरकर यांनी सांगितले.

आरजी गोमंतकीयांसाठी

दरम्यान, वीरेश बोरकर यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'रिव्होल्यूशनरी गोवन्स ही चळवळ किंवा पक्ष एखाद्या व्यक्तीसाठी निर्माण झालेला नाही, तर गोव्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येक गोमंतकीयासाठी उभा राहिला आहे. गोव्याचा विनाश, वादग्रस्त ३९ अ तसेच राज्याची ओळख, संस्कृती आणि अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या धोरणांविरोधातील संघर्ष हा कधीच वैयक्तिक नव्हता. आमची लढाई नेहमीच गावांचे संरक्षण, संस्कृतीचे जतन, शेती, नद्या आणि भावी पिढ्यांच्या भवितव्यासाठी होती,' असे बोरकर यांनी म्हटले. गोव्याच्या प्रश्नांवर स्पष्टपणे बोलल्यामुळे विरोधक निर्माण होत असतील, तर ते नम्रतेने स्वीकारण्याची तयारी आहे' असेही बोरकर यांनी म्हटले आहे.
 

Web Title : विधायक वीरेश पर कार्रवाई? आरजी में विवाद बढ़ा; विधायकों ने बैठक टाली।

Web Summary : विधायक वीरेश बोरकर को नोटिस के बाद स्पष्टीकरण बैठक में अनुपस्थित रहने पर रिवोल्यूशनरी गोवन्स पार्टी में दरार और गहरी हो गई। पार्टी ने चेतावनी दी है कि उन्हें हल्के में न लें। बोरकर ने गोवा के प्रति प्रतिबद्धता जताई और पहले से तय कार्यों का हवाला दिया। उन्होंने निष्ठा की पुष्टि की और भविष्य में बैठक का प्रस्ताव रखा।

Web Title : Action against MLA Viresh? RGs' dispute escalates; MLAs ignore meeting.

Web Summary : Revolutionary Goans Party rift deepens as MLA Viresh Borkar skips explanation meeting after receiving notice. Party warns against taking them lightly. Borkar asserts commitment to Goa, citing prior engagements. He affirms loyalty and proposes a future meeting.