शिकारीचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत!; साकोर्डा येथील वाघाच्या मृत्यू प्रकरणात विश्वजीत राणे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 13:44 IST2026-05-09T13:43:36+5:302026-05-09T13:44:26+5:30
अंतिम निष्कर्षासाठी फॉरेन्सिक, टॉक्सिकॉलॉजी आणि डीएनए तपासणीसाठी डेहराडूनला पाठवले नमुने, अहवालांची प्रतीक्षा; पर्यावरणप्रेमींकडून मात्र प्रकरणाच्या तपासावर नाराजी

शिकारीचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत!; साकोर्डा येथील वाघाच्या मृत्यू प्रकरणात विश्वजीत राणे यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : साकोर्डा परिसरात मृतावस्थेत आढळून आलेल्या वाघाच्या प्रकरणात शिकारीचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याची माहिती वनमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. वन अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री राणे म्हणाले की, शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार वाघिणीच्या शरीरावर गोळीबार, सापळे, वायर किंवा बाह्य जखमांचे कोणतेही ठोस पुरावे आढळून आलेले नाहीत.
तपासादरम्यान घटनास्थळीही शिकारीसाठी वापरली जाणारी सामग्री सापडलेली नाही. वाघाचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे अंतिम निष्कर्षासाठी फॉरेन्सिक, टॉक्सिकॉलॉजी आणि डीएनए तपासणी अहवालांची प्रतीक्षा आहे.
वाघाचा मृतदेह मोठ्या प्रमाणावर विघटित झालेला होता. त्यामुळे अनेक बाबींचा तपास प्रयोगशाळेतील विश्लेषणावर अवलंबून आहे. विषबाधा, अंतर्गत संसर्ग, नैसर्गिक मृत्यू किंवा इतर शक्यता तपासल्या जात आहेत. वन विभागाने या प्रकरणासंदर्भातील प्राथमिक अहवाल सरकारला सादर केला आहे. वाघाच्या ऊतकांचे आणि इतर जैविक नमुन्यांचे संकलन करून ते फॉरेन्सिक, डीएनए आणि विषतपासणीसाठी देहरादून येथे वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अंतिम अहवालांनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, सध्या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू अंतिम फॉरेन्सिक आणि विषतपासणी अहवाल ठरला आहे. या अहवालानंतरच वाघाच्या मृत्यूमागचे खरे कारण स्पष्ट होणार असून, त्यानंतर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे. या घटनेवरून ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी या प्रकरणातील सर्व माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.
'गावडेच्या खुनाचा संशय, पोलिसांनी चौकशी करावी'
बेतोडा येथे दिनेश गावडे याचा मृत्यू गवारेड्याच्या हल्ल्याने नव्हे तर इतर कारणामुळे झाला असावा असे वनमंत्री विश्वजीत राणे यांचे म्हणणे असून हे प्रकरण खुनाचे असू शकते, असा अप्रत्यक्ष कयास व्यक्त करताना पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राणे म्हणाले की, या प्रकरणात वन खात्याने आपले मत मांडले असून पोलिसांनी योग्यरीत्या चौकशी करणे आवश्यक आहे. गवा रेड्याचा हल्ला वेगळ्या प्रकारचा असतो. माझ्या मतदारसंघातील गरीब युवकाचा बळी गेला आहे. त्याच्या परिवाराच्या खर्चाची जबाबदारी वगैरे मी घेतली आहे हा वेगळा भाग, परंतु या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.
धारबांदोडा आणि भगवान महावीर अभयारण्य परिसर हा पश्चिम घाटातील जैवविविधतेने समृद्ध पट्टा मानला जातो. गेल्या काही वर्षात या भागात वाघांच्या हालचाली कॅमेरा ट्रॅपमध्ये नोंदल्या गेल्या आहेत. जंगल क्षेत्रांत वाढता मानवी हस्तक्षेप, रस्ते, खाणकाम आणि अधिवासावरील ताण यामुळे वन्यजिवांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे.
घटनेची पार्श्वभूमी
गेल्या आठवड्यात एक वाघ साकोर्डा येथील जंगलपट्ट्यात मृतावस्थेत आढळून आली होती. हा भाग भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य परिसरालगतचा आहे. वाघाचे दात आणि इतर अवयवांच्या स्थितीवरून विविध तर्क-वितर्क सुरू झाले होते. गुरांवर हल्ले, वन्यप्राण्यांची गावांमध्ये वर्दळ आणि अधिवासांवरील ताण यामुळे वन विभाग अधिक सतर्क झाला आहे. अशा परिस्थितीत वाघिणीच्या मृत्यूच्या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
केरकर म्हणतात...
साकोर्डा येथे गेल्या आठवड्यात मृत अवस्थेत आढळलेल्या वाघाच्या प्रकरणात वन खात्याकडून पारदर्शक चौकशी होत नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी केला आहे. शवचिकित्सा पूर्ण झाली असली तरी त्याचा अहवाल व संबंधित माहिती जनतेसमोर मांडली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. वाघासारख्या महत्त्वाच्या वन्यप्राण्याच्या मृत्यूबाबत स्पष्ट माहिती मिळणे गरजेचे आहे. मात्र, उपवनसंरक्षकांकडून कोणतीही ठोस माहिती दिली जात नाही. त्यामुळे लोकांमध्ये संशय निर्माण होत आहे. आवश्यक माहिती न दिल्यास आंदोलनाचा इशारा देत, गरज पडल्यास उपोषण करण्यासही आपण तयार असल्याचे केरकर यांनी स्पष्ट केले.