वर्षभरापूर्वीच पडली होती दुहीची ठिणगी; लोकसभा निवडणुकीत वीरेश यांची होती वेगळी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 12:05 IST2026-05-18T12:02:47+5:302026-05-18T12:05:55+5:30

या दुहीची सुरुवात ही वर्षभरापूर्वी झाली होती. 

the spark of the war in rg party was ignited a year ago mla viresh borkar had a different role in the lok sabha elections | वर्षभरापूर्वीच पडली होती दुहीची ठिणगी; लोकसभा निवडणुकीत वीरेश यांची होती वेगळी भूमिका

वर्षभरापूर्वीच पडली होती दुहीची ठिणगी; लोकसभा निवडणुकीत वीरेश यांची होती वेगळी भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आमदार वीरेश बोरकर यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून मनोज परब यांच्या नेतृत्वाखालील रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने नोटीस बजावण्यापर्यंत आमदार बोरकर व परब यांचे संबंध अलीकडे ताणले गेले असले, तरी या दुहीची सुरुवात ही वर्षभरापूर्वी झाली होती. 

२०२५ मधील लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात पक्षाने काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नाडिस यांना पाठिंबा द्यावा, असे ठाम मत बोरकर यांचे होते. मात्र, परब व त्यांच्या जवळच्या काही पदाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला विरोध केला, अशी माहिती आता उघड झाली आहे.

विरोधी आघाडीला बळकटी मिळावी, यासाठी भाजपच्या उमेदवाराविरुद्ध एकत्र लढा द्यावा, अशी भूमिका बोरकर व त्यांच्या समर्थकांची होती. काँग्रेसने चांगला उमेदवार दिल्यास त्याला पाठिंबा द्यावा, असेही म्हटले होते. विरियातो हे नवखे व चांगली प्रतिमा असलेले उमेदवार असल्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यास कोणतीही हरकत नसावी, असे बोरकर यांचे मत होते, अशी माहिती आता सूत्रांकडून देण्यात येते. मात्र, परब यांच्या हट्टापुढे त्यांना नमते घ्यावे लागले, असाही बोरकर यांच्या समर्थकांचा दावा आहे. 

उत्तर गोव्याबाबत वीरेश यांनी पक्षाच्या भूमिकेशी सहमती दर्शविली होती, असेही समजते. तर न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांनी सुरू केलेल्या चळवळीत सहभागी होण्यावरून पक्षात दोन भाग पडले. वीरेश समर्थक त्यामध्ये सहभागी झाले. परब मात्र त्यापासून लांब राहिले. पणजीत झालेल्या आंदोलनातही अशीच स्थिती दिसून आली होती, असे काहींचे म्हणणे आहे.

या चळवळीचा भाग म्हणून मडगाव येथील सभेत सामील होऊन उत्साहाने ढोल बडविणाऱ्या एका आरजी कार्यकर्त्याला परब यांनी फोन करून बरे-वाईट सुनावल्याचे हा कार्यकर्ताच सांगतो. केवळ लोकसभा निवडणूक हाच मुद्दा नव्हता, तर त्यानंतरही इतर खूप कारणांनी त्यात भर घातली गेली. सतत आंदोलने करणारे बोरकर हे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना या आंदोलनांविषयी विश्वासात घेत नसल्याच्या परब यांच्या समर्थकांच्या तक्रारी आहेत.

३९ अ विरोधात झालेल्या आंदोलनाच्या वेळीही आणि दोनापावला येथील निदर्शनाच्या वेळीही आरजीमधील दोन गट स्पष्टपणे जाणवत होते. वीरेश यांच्या समर्थकांना पक्षाच्या प्रमुख पदांवरून काढून टाकण्यात आल्याचा बोरकर समर्थकांचा दावा आहे. पक्षाच्या केंद्रीय समितीवरूनही जी माणसे कमी केली, त्यात बोरकर यांच्याशी चांगले संबंध असलेली माणसे होती.

वीरेशच्या भूमिकेकडे नजरा

न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांच्या पुढाकाराने गोव्यात छेडलेल्या 'इनफ इज इनफ' चळवळीला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरूनही आरजीत दोन मतप्रवाह झाले. आमदार वीरेश यांच्यासह त्यांचे समर्थक या चळवळीत सक्रिय सामील होते, तर परब या चळवळीपासून लांब राहिले.

आमदार वीरेश बोरकर यांना आज, सोमवारी कार्यालयात येऊन स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. मात्र नोटीशीवर ते कसे काय व्यक्त होतील की दुर्लक्ष करतील, याबाबत त्यांच्या समर्थकांनाही ठाऊक नाही. सर्वांच्या नजरा बोरकर यांच्या भूमिकेकडे लागल्या आहेत.
 

Web Title : रिव्होल्यूशनरी गोवन्स में दरार: नोटिस से पहले पुरानी असहमति फिर उभरी

Web Summary : रिव्होल्यूशनरी गोवन्स पार्टी के भीतर आंतरिक विवाद, जो एक साल से चल रहा था, लोकसभा चुनावों में कांग्रेस उम्मीदवार का समर्थन करने पर असहमति के बाद बढ़ गया। सामाजिक आंदोलनों में भागीदारी को लेकर भी मतभेद सामने आए, जिसके कारण विधायक वीरेश बोरकर को औपचारिक नोटिस जारी किया गया।

Web Title : Rift in Revolutionary Goans: Old disagreements resurface before notice

Web Summary : Internal disputes within the Revolutionary Goans Party, simmering for a year, escalated after disagreements over supporting a Congress candidate in the Lok Sabha elections. Differences also emerged regarding participation in social movements, leading to a formal notice to MLA Viresh Borkar.